जमिनीला जीवदान देणारा जैविक पर्याय : DAPच्या साखळीतून मुक्त व्हा, शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारा!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दीर्घकालीन उत्पादनक्षमता, जमिनीची सुपीकता आणि पर्यावरणीय संतुलन जपण्यासाठी DAP या रासायनिक खताचा अतिरेक टाळावा आणि त्याला पर्यायी जैविक खतांचा अवलंब करावा, असे ठाम आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रीती हीरळकर यांनी केले आहे.
DAP हे नत्र आणि स्फुरद युक्त खत असून झपाट्याने परिणाम देणारे असले तरी त्याचा सातत्यपूर्ण वापर जमिनीच्या सूक्ष्मजीव साखळीसाठी घातक ठरतो. परिणामी, जमिनीची उत्पादकता कालांतराने खालावते आणि पिकांवर रासायनिक अवलंबित्व वाढते. याला पर्याय म्हणून PSB (फॉस्फेट विरघळवणारे जिवाणू), रायझोबियम, अझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, KMB जिवाणू, मायकोरायझा बुरशी, PROM (प्रोसेस्ड ऑर्गेनिक मॅन्युअर) आणि पारंपरिक कंपोस्ट व शेणखत यांसारख्या जैविक पर्यायांचा शेतकऱ्यांनी सक्रिय वापर करावा. हे नैसर्गिक घटक जमिनीतील अन्नद्रव्यांचा सेंद्रिय पुरवठा करतात, पिकांच्या मुळांशी सजीव सहजीवन राखतात आणि नत्र-स्फुरद-पालाशाच्या उपलब्धतेत सातत्य ठेवतात.
यामुळे केवळ उत्पादन टिकून राहत नाही तर रोगप्रतिकारशक्ती वाढते, पाण्याची बचत होते, आणि प्रदूषण नियंत्रणात राहते. जैविक खतांचा योग्य वापर करण्यासाठी माती परीक्षण गरजेचे आहे. तसेच ही खते थंड, कोरड्या आणि अंधाऱ्या ठिकाणी साठवावी आणि रासायनिक कीटकनाशकांपासून दूर ठेवावीत. आज शेती टिकवायची असेल, तर जमिनीच्या आरोग्यावर भर द्या, रासायनिक जाळ्यातून बाहेर पडा आणि जैविक समृद्धतेच्या मार्गावर ठाम पावले टाका, असे स्पष्ट संकेत प्रीती हीरळकर यांनी दिले आहेत. जैविक शेती म्हणजे फक्त विकल्प नाही, तर आपल्या भविष्यासाठी गरजेची क्रांती आहे.
Comments are closed.