अहेरी–आल्लापल्ली मार्गावर भरधाव अज्ञात वाहनाची ऑटोला धडक; ८ प्रवासी जखमी, ४ जणांची प्रकृती चिंताजनक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरीहून आल्लापल्लीकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षाला पाठीमागून आलेल्या भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. ही घटना सोमवारी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास लोकबिरादरी व प्राणहिता पोलीस कॅम्पदरम्यान घडली. या अपघातात ऑटोमधील एकूण आठ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रवासी ऑटो (क्रमांक एम.एच. ३३ डब्ल्यू ००४८) अहेरीवरून आल्लापल्लीच्या दिशेने मार्गस्थ असताना पाठीमागून आलेल्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्याला जबर धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की ऑटो रस्त्यावर उलटला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला.
या दुर्घटनेत ऑटो चालक अब्दुल जाकीर शेख (वय ४१, रा. अहेरी) याच्या छातीला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यासह तनवीरजा गफूर शेख (२८), हुसनबी सरवर शेख (६०), जमीला हसन शेख (४७), ममता वेलादी (२५, रा. भंगारामपेठा), श्यामला येमुलवार (३९, रा. अहेरी), शांता गडडमवार (६५, रा. कोत्तुर) आणि मंगेश मेश्राम (३७, रा. नवेगाव) हे प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत सर्व जखमींना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर ऑटो चालक अब्दुल जाकीर शेख, मंगेश मेश्राम व ममता वेलादी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून, पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चैतन्य घावटे पुढील तपास करीत आहेत.

