Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पॅरा राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत अनु रघुपती नैतामची चमकदार कामगिरी

रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड...

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना आणि पिंपरी–चिंचवड धनुर्विद्या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या पॅरा राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याची कन्या अनु रघुपती नैताम हिने उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात मानाचा ठसा उमटवला आहे. दिनांक ३ जानेवारी रोजी पिंपरी–चिंचवड येथील सी. एम. इंटरनॅशनल स्कूल, बानेर येथे झालेल्या या स्पर्धेत अनु हिने ‘इंडियन राउंड’ प्रकारात वैयक्तिक रौप्य पदकाची कमाई केली.

या उज्ज्वल कामगिरीच्या बळावर अनु रघुपती नैतामची पटियाला (पंजाब) येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील पॅरा धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली असून, गडचिरोली जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे अनु ही गडचिरोली येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेची विद्यार्थिनी असून, दुर्गम भागातून आलेली ही खेळाडू राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

स्पर्धेतील विजयी खेळाडूंना पद्मश्री पुरस्कारार्थी तथा ज्येष्ठ धनुर्धर श्री. मुरलीधर पेटकर यांच्या शुभहस्ते पदक प्रदान करून गौरविण्यात आले. अनुच्या या यशाबद्दल सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अरुण एम., सहायक प्रकल्प अधिकारी वहीद शेख, डॉ. प्रभू सादमवार, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना महल्ले, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, क्रीडा अधिकारी घनश्याम वरारकर, चंद्रशेखर मेश्राम, श्रीराज बदोले, नाजूक उईके, सुप्रसिद्ध बडकेलवार, गडचिरोली जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव डॉ. श्याम कोरडे, सुशील अवसरमोल, पायलट प्रोजेक्ट धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राचे मार्गदर्शक रोशन सोलंके, कु. कौमुदी श्रीरामवार, हिमालय शेरखी, अधीक्षक देविदास चोपडे, अधीक्षिका निमा राठोड तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून तिच्या राष्ट्रीय स्तरावरील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

अनु रघुपती नैतामचे हे यश केवळ वैयक्तिक नसून, गडचिरोलीसारख्या दुर्गम आदिवासी जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये असलेली गुणवत्ता, चिकाटी आणि संधी मिळाल्यास आंतरराष्ट्रीय क्षितिजावर झेप घेण्याची क्षमता अधोरेखित करणारे ठरत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.