Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनांसाठी 30 नोव्हेंबरपर्यत अर्ज आमंत्रित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि. ५ ऑक्टोबर :- राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छूक ग्रंथालयांनी आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत जिल्हा ग्रंथालय कार्यालयास 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत आपले प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सु.श्री. गजभारे यांनी केले आहे.

भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभांगातर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता यांच्या समान व असमान निधी योजनेतर्गंत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येतात. समान व असमान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार 2024-25 साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भांतील नियम, अटी व अर्जाचा नमुना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील इच्छूक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सन 2024-25 साठीच्या समान निधी योजना पुढील प्रमाणे आहे. इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना 25 लाख रुपये. उपरोक्त योजने व्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करु नयेत. सन 2024-25 साठीच्या असमान निधी योजना पुढीलप्रमाणे आहेत. ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य (फर्निचर खरेदी 4 लाख रुपये व इमारत बांधकाम 10 ते 15 लाख रुपये). “राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान “ज्ञान कोपरा” विकसीत करण्यासाठी अर्थसहाय्य- 2 लाख 50 हजार रुपये व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरण 2 लाख रुपये. महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य 6 लाख 20 हजार रुपये व इमारत विस्तार 10 लाख रुपये. राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरूकता कार्यक्रम आयोजनांसाठी अर्थसहाय्य 1 लाख 50 हजार रुपये/ 2 लाख 50 हजार रुपये/ 3 लाख रुपये. बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय कोपरा स्थापन करण्याकरीता अर्थसहाय्य 6 लाख 80 हजार रुपये याप्रमाणे आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.