गडचिरोलीत अनुकंपा आणि सरळसेवेच्या प्रतिक्षा यादीतील २१० उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान
सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे आवाहन – ‘सरकारी सेवेत लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले पाहिजे’...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासनाच्या सेवेत असणारा प्रत्येक अधिकारी- कर्मचारी हा केवळ नोकरी करणारा नसून तो जनतेच्या विश्वासाचा दूत असतो. तुमच्या सेवेमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि शासनाविषयीचा विश्वास उमटला पाहिजे,असे आवाहन सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांना केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अनुकंपा आणि सरळसेवेच्या प्रतिक्षा यादीतील २१० उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. राज्यातील मुख्य कार्यक्रम मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाला. गडचिरोलीतील या सोहळ्याला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सहपालकमंत्री जयस्वाल म्हणाले की, शासनाने दिलेली ही संधी ही केवळ नोकरी नाही तर जबाबदारी आहे. तुमच्या नियुक्तीला समाजाने संमती दिली आहे. त्यामुळे प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सेवा भाव यांना प्राधान्य द्या. जनतेला सुलभ, जलद आणि संवेदनशील सेवा देणे हेच खरे यश आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी माहिती दिली की, निवड प्रक्रियेतून ८० उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत, तर १३० उमेदवार अनुकंपा तत्त्वावर निवडले गेले. यात ५९ महिला आहेत. विशेष म्हणजे, अनुकंपा यादीतील ११ उमेदवार दहा वर्षांपासून, तर दोन उमेदवार तब्बल १५ वर्षांपासून प्रतीक्षा करत होते. अखेर त्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला.
या क्षणी नियुक्तीपत्र स्वीकारताना अनेक उमेदवारांच्या डोळ्यांत आनंदाश्रू चमकले. सभागृहात टाळ्यांचा गजर झाला आणि उपस्थित पालकांच्या चेहऱ्यावर समाधान उमटले. जिल्हाधिकारी पंडा यांनी नव्या उमेदवारांना जिल्ह्याच्या विकासात सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.