रेमडेसिविरचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न: राज्यमंत्री मंडाविया
- निर्यात बंद करण्याचा सरकारकडून निर्णय
नवी दिल्ली, दि. २० एप्रिल: सध्या देशभरात तुटवडा असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी म्हटले आहे. राज्यासह देशभरात रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर इंजेक्शनची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या १५ दिवसांत दुप्पट उत्पादन वाढ होणे अपेक्षित आहे. सध्या उत्पादनाचा दैनिक वेग दीड लाख इतका असून, तो तीन लाखांपर्यंत नेण्याची सरकारची योजना आहे, असे मनसुख मंडाविया यांनी स्पष्ट केले. केंद्रीय रसायन तसेच खतमंत्री सदानंद गौडा यांच्यानुसार, रेमडेसिविरचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पाऊले उचलत आहे. मागील पाच दिवसांत सहा लाख ६९ हजार रेमेडेसिविर वेगवेगळ्या राज्ये आणि कें द्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून दिली आहेत. हे उत्पादन २८ लाख बॉटल्स प्रतिमहिना वाढवून ४१ लाख प्रतिमहिना इतकी करण्यात आली आहे. याशिवाय देशभरात कोरोनाबाधितांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनच्या किमतीत मोठी कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. संबंधित कंपन्यांनी सुमारे ७० टक्क्यांपर्यंत किमतीत कपात केली आहे. यापूर्वी वाढती मागणी लक्षात घेता हे उत्पादन वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान, जिलीड सायन्सेस कंपनीने इबोला विषाणूचा उपचार म्हणून रेमडेसिविर विकसित केले होते. परंतु, आता त्याचा उपयोग कोरोनाच्या उपचारासाठी केला जात आहे.
Comments are closed.