हत्तीरोग प्रतिबंधासाठी आश्रमशाळांमध्ये जनजागृती व वैद्यकीय मोहीम सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली १८ जुलै: जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात १६ जुलैपासून राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण अभियानांतर्गत शासकीय व निमशासकीय आश्रमशाळांमध्ये हत्तीरोग प्रतिबंधात्मक आरोग्य मोहीम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक जागरूकतेला चालना देत, संभाव्य लक्षणांची वेळीच तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना हत्तीरोगाची कारणे, संसर्गाची प्रक्रिया, लक्षणे आणि प्रतिबंध याविषयी सखोल माहिती देण्यात येत आहे. प्राथमिक तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या कडेवर सूज, गाठी यांसारख्या संशयास्पद लक्षणांची वैद्यकीय छाननी करण्यात आली. अशा लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंद घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे पाठवले जात आहे.
शाळा परिसरात डास निर्मूलनासाठी कीटकनाशक फवारणी करण्यात येत असून, साचलेले पाणी, झुडपे व अस्वच्छतेचे ठिकाणे नष्ट करून डासांची उत्पत्ती रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या मोहिमेसाठी जिल्हा हत्तीरोग नियंत्रण विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, आणि स्थानिक उपपथकांचे कर्मचारी एकत्रितपणे काम करत आहेत. याच धर्तीवर तालुक्यातील इतरही शाळांमध्ये मोहिमा राबवण्याची तयारी सुरू आहे.
हत्तीरोग: सावधगिरीने टाळता येणारा गंभीर आजार..
हत्तीरोग हा डासांमार्फत पसरणारा संसर्गजन्य रोग असून, कालांतराने तो शरीरात सूज, वेदना आणि अवयवविकृती निर्माण करतो. यामुळे व्यक्तीच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होतो. आरोग्य विभागानुसार, कोणत्याही वयोगटातील स्त्री वा पुरुष हत्तीरोगाने बाधित होऊ शकतो. विशेषतः स्थलांतर करणाऱ्या लोकांमुळे या आजाराचा प्रसार अधिक प्रमाणात दिसून येतो.
हत्तीरोग प्रतिबंधाचे महत्त्वाचे उपाय …
@साचलेल्या पाण्याचे स्रोत, झुडपे, गवत यांचे व्यवस्थापन
@घरगुती व सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य
@कीटकनाशकांची वेळेवर फवारणी
@डासांच्या अळ्यांचे निर्मूलन
@शाळा, वस्त्या, ग्रामीण भागात आरोग्यप्रशिक्षण
@बाधित रुग्णांनी वैयक्तिक स्वच्छता व संरक्षण पाळणे
तज्ज्ञांचे मत – स्वच्छता हीच बचावाची पहिली पायरी…
आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, हत्तीरोगाने बाधित रुग्णांनी त्यांच्या पायांची आणि इतर बाधित अवयवांची दररोज साबण-पाण्याने स्वच्छता करावी. पायाला जखम होणार नाही याची खबरदारी घेऊन योग्य आकाराच्या चपला वापरणे, स्थानिक स्वच्छता राखणे आणि सतत वैद्यकीय संपर्क ठेवणे अत्यावश्यक आहे.
Comments are closed.