नवेगावात मानवाधिकार दिनानिमित्त जनजागृती रॅली; विद्यार्थ्यांमध्ये मानवमूल्यांची जागृती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: शहरालगत असलेल्या नवेगाव येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त १० डिसेंबर रोजी नवेगाव येथे जनजागृतीचा प्रभावी उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि शिवानी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या प्रभात फेरीतून गावभर मानवाधिकारांविषयी जागरूकतेचा जाहीर संदेश देण्यात आला. “मानवाचा हक्क—मानवतेचा सन्मान” अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले.

प्रभात फेरीनंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित मुख्य कार्यक्रमात संयुक्त नैतिक मानवाधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष विनोद बुरांडे यांनी विद्यार्थ्यांना मानवाधिकारांची मूलभूत तत्त्वे, प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याची व्याप्ती, समाजातील परस्पर सन्मानाची गरज आणि न्याय-अन्याय ओळखण्याची जबाबदारी यांवर सखोल मार्गदर्शन केले. मानवाधिकार ही केवळ कायदेशीर धारणा नसून मानवी संस्कृतीचा पाया आहे, असे मत त्यांनी मांडले.
विद्यार्थ्यांमध्ये नागरिकत्व मूल्यांची रुजवण आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी मुलांना विविध उदाहरणांद्वारे मानवी हक्कांचे प्रत्यक्ष जीवनाशी असलेले नाते स्पष्ट केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करून मानवाधिकार दिनाचा संदेश औपचारिकपणे देण्यात आला.

