जुनोना जंगलात अस्वलाचा हल्ला; पिता-पुत्र गंभीर जखमी, वडिलांची प्रकृती चिंताजनक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जुनोना जंगल परिसरात सोमवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. कुड्याच्या भाजीची पाने तोडण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्रावर अचानक अस्वलाने हल्ला चढविला. या भीषण हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून वडिलांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. हा हल्ला मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाल्याने घटनेची भीषणता अधिक ठळकपणे समोर आली आहे.
जखमींची नावे अरुण कुपसे (वडील) आणि विजय कुपसे (मुलगा) अशी असून, दोघांना तातडीने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अरुण कुपसे यांच्या शरीरावर गंभीर जखमा असल्याने प्राथमिक उपचारांनंतर त्यांना नागपूरला रवाना करण्यात आले. मुलगा विजय यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि जलद प्रतिसाद पथक घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोर अस्वलीला पकडण्यासाठी मोहिम राबविण्यात येत असून परिसरातील नागरिकांना जंगलात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अस्वलांचा परिसरातील वावर हा गेल्या काही महिन्यांपासून वाढला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मानवी वस्तीच्या जवळपास अस्वलांच्या हालचाली होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
Comments are closed.