Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वनउपज संकलनावर भर देऊन आत्मनिर्भर व्हा- डॉ. प्रशांत भरणे

बोरी येथे बचत गटाच्या महिलांची मार्गदर्शन कार्यशाळा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

धानोरा 4 ऑगस्ट :-  शासनाच्या वतीने विविध महत्वकांक्षी योजना राबवून ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करून त्यांना आत्मनिर्भर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. घरातील स्त्री एकट्या पुरुषांच्या कमाईवर अवलंबून न राहता आत्मनिर्भर होऊन कुटूंबाचा आर्थिक स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याच दृष्टीकोनातुन महिलांना जंगलातील विविध प्रजातीच्या वनौषधी, फळे, फुले जमा करून चांगला नफा मिळवता येऊ शकतो. त्यामुळे याकडे अधिकाधिक लक्ष देऊन स्वयं- रोजगार उभारून नानाविध वस्तू तयार करून त्यांच्या विक्रीतुन अधिकाअधिक नफा कमावण्याचा प्रयत्न महिलांनी करावा, असे प्रतिपादन संस्थेचे संचालक डॉ प्रशांत भरणे यांनी केले. बैठकीत महिलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. भरणे यांनी सांगितले की, जंगलातील विविध प्रजातीच्या फुलांना, फळांना बाजारपेठेत चांगली मांग आहे. तसेच जिल्ह्यातील जंगलात मोठ्या प्रमाणावर वनौषधी आहे. त्याचे संकलन करा आम्ही संस्थेच्या माध्यमातून त्या वस्तूला चांगला भाव मिळवून देऊ असेही ते म्हणाले. तसेच गटांतील सर्व महिलांनी जंगलातील फळा-फुलापासून विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण घेऊन आपली आर्थिक स्थिती सुधारावी असे आवाहन केले. यावेळी बँकेचे व्यवस्थापक अनिलजी क्षीरसागर यांनी महिला बचत गटासाठी बँकेच्या विविध योजना, गृहकर्ज, सोने तारण इत्यादी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

के व्ही आय सी, मुंबई व खादी ग्रामोद्योग, नागपूर यांच्या द्वारे संचालित गडचिरोली हर्बल कलस्टर बहुउद्देशीय सहकारी संस्था, पोरला, मर्यादित गडचिरोली च्या वतीने धानोरा तालुक्यातील आदिवासी, दुर्गम भागातील बोरी ( रांगी )येथील बचत गटाच्या महिलांना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने त्यांना योग्य ते मार्गदर्शन व त्यांना विविध योजनांची माहिती देण्यासाठी महिला बचत गटाच्या कार्यशाळेचे आयोजन बोरी येथील शेतकरी महिला सौ. उषाबाई लाकुडवाहे यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते.
काल दि. 3 ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली हर्बल कलस्टर संस्थेचे संचालक तथा मुख्य प्रवर्तक डॉ. श्री प्रशांतजी भरणे होते तर विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून नागपूर नागरी सहकारी बँक शाखा गडचिरोली चे व्यवस्थापक मा. श्री अनिलजी क्षिरसागर प्रामुख्याने उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. उषाबाई डोमाजी लाकुडवाहे, संस्थेचे अमितजी काळबांधे सौ कहूरके, सौ बह्यड, सौ. दाजगये, सौ. लाकूडवाहे उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम सर्व बचत गटाच्या महिलांचा परिचय करण्यात आला तद्नंतर महिलांच्या सक्षमीकरणसाठी व त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी काय करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गावखेड्या लगतच्या जंगलातील वन उपज, वनौषधी गोळा करणे, त्याला सुखवुन शहरातील बाजारपेठेत विकून आपला आर्थिक स्तर कसा उंचावता येईल याबाबतही महिलांना सखोल माहिती देण्यात आली .
तसेच ग्रामीण भागातील शेतकरी महिलाना शेतीची विविध कामे करतांना वेळोवेळी जंगल वाटेने शेताकडे जावे लागते सद्यस्थितीत पावसाचे दिवस असल्याने साप, विंचू यांच्यापासून शेतकऱ्यांच्या जीवितास धोका होऊ शकते. अशा वेळी एखादी कुटुंब प्रमुख महिला दगावली तर कुटुंब वाऱ्यावर येते. त्यामुळे त्यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत कशी करता येईल यावर चर्चा करून संस्थेच्या वतीने गटातील सर्व महिलांचे मासिक 300 रुपयाचा विमा काढण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. त्यानुसार सर्व महिलांचे आधार कार्ड जमा करून गडचिरोली हर्बल कलस्टर संस्था, पोरला, गडचिरोली च्या वतीने 200 रुपये भरून त्यांचे बँक खाते उघडण्यात आले. व सर्व महिलांचा विमा संरक्षण देण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीला बोरी गावातील 25 महिला उपस्थित होत्या. बैठकीचे संचालन राजेंद्र भुरसे यांनी तर आभार लक्ष्मणराव वरपल्लीवार यांनी मानले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

एकतर्फी प्रेमाचा किडा… युवतीवर केला चाकू हल्ला..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.