गडचिरोलीच्या दुर्गम हेडरीत ‘ब्लॅक फॉरेस्ट बेकरी’ – विकासाच्या गोड प्रवासाला नवी दिशा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
हेडरी, (गडचिरोली) दि.१२ :
गडचिरोलीच्या आदिवासी पट्ट्यात विकासाची गोड चव आता खऱ्या अर्थाने लोकांच्या जिभेवर चढू लागली आहे. सोमवारी एटापल्ली तालुक्यातील हेडरी गावात जिल्ह्यातील पहिली उच्च दर्जाची बेकरी – ‘ब्लॅक फॉरेस्ट बेकरी’ कार्यान्वित झाली. ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना रोजगाराची संधी, तर नागरिकांना शहरी चवीचा आस्वाद मिळवून देणारा हा उपक्रम जिल्ह्याच्या बदलत्या रूपाचा प्रतीक ठरत आहे.
गावातील आणि परिसरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत झालेल्या या उद्घाटन सोहळ्यात पुरसलगोंदीच्या सरपंच अरुणा सडमेक, तोडसाच्या सरपंच वनिता कोरामी, नागुलवाडीचे सरपंच नेवलू गावडे, उपसरपंच प्रशांत आत्राम, राजू तिम्मा, माजी सरपंच कात्या तेलामी, कल्पना आलाम, ग्रामपंचायत सदस्य छाया जेट्टी आदींसह लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) चे व्यवस्थापकीय संचालक आणि लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशनचे संचालक बी. प्रभाकरन यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बेकरीत विविध प्रकारचे केक, पाव, बिस्किटे, पेस्ट्री यांचे उत्पादन होणार असून, स्थानिक ग्राहकांसह तालुक्याभरातील लोकांना दर्जेदार खाद्यपदार्थ सहज उपलब्ध होतील.या आधी २७ जून रोजी कोनसरी येथे अशाच प्रकारची ब्लॅक फॉरेस्ट बेकरी व फूड प्लाझा सुरु करण्यात आला होता. कोनसरी हे एलएमईएलच्या डीआरआय व पेलेट प्रकल्पाचे कार्यक्षेत्र असून, येथे ४.५ एमटीपीए क्षमतेचा एकात्मिक पोलाद प्रकल्प प्रस्तावित आहे.
कार्यक्रमानंतर प्रभाकरन यांनी हेडरीतील बेकरीची पाहणी केली आणि एलएमईएल अधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी हा उपक्रम ग्रामीण युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन करत लॉईड्स मेटल्सच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
“ही बेकरी केवळ एक व्यावसायिक उपक्रम नसून, गडचिरोलीच्या दुर्गम भागातील विकासाचे ठोस पाऊल आहे. येथील नागरिकांनी स्वतःच्या हातांनी लिहिलेल्या या परिवर्तनकथेतील हा आणखी एक प्रशंसनीय अध्याय आहे. अशा योजनांमुळे लोकांची जीवनशैली उंचावेल, आत्मविश्वास वाढेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल.
श्री. बी.प्रभाकरन, लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) चे व्यवस्थापकीय संचालक आणि लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशनचे संचालक..
एचपीव्ही लसीकरण मोहिमेने गडचिरोलीत उभारला ‘आरोग्याचा संरक्षण कवच’
Comments are closed.