घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस;आरोपी गजाआड
१.३५ लाखांचा ऐवज हस्तगत गुन्हेगारीला आव्हान देणारी पोलिसांची तत्परता..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भद्रावती दि,१४ : शहरातील तांडा भागात १२ जूनच्या रात्री एका बंद घरात झालेल्या घरफोडीच्या प्रकरणात केवळ १२ तासांत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चोरी गेलेला सर्व सोन्याचा ऐवज हस्तगत केल्याची यशस्वी कारवाई केली आहे. ही कामगिरी स्थानिक पोलिसांच्या गुप्त माहिती संकलन आणि तांत्रिक तपास कौशल्याचे उत्तम उदाहरण ठरली आहे.
घटनेविषयी अधिक माहिती अशी की, अजय विजय माडोत (वय ३०, रा. तांडा) हे कुटुंबासह गावाबाहेर गेले असताना रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील लॉकरमधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा माल चोरून नेला. माडोत यांच्या फिर्यादीवरून भद्रावती पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (३)(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषणाला सुरुवात केली. गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे संशयित सोनू रामदास धारावत (वय ४०, रा. बरांज मोकासा तांडा) याला अटक करण्यात आली. चौकशीअंती त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून १.३५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांच्या नेतृत्वात पोउपनि गजानन तुपकर, सफौ महेंद्र बेसरकर, पोहवा अनुप आस्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चौधरी, पोअं खुशाल कावळे, योगेश घाटोळे यांनी केली.
या यशस्वी कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे. सतत वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमध्ये पोलिसांच्या तत्परतेमुळे नियंत्रण येत असल्याचे चित्र आहे. मात्र, घराबाहेर जाण्यापूर्वी नागरिकांनी घरोघरी सीसीटीव्ही बसवणे, शेजाऱ्यांना कल्पना देणे व किमान सुरक्षा उपाय जरूर पाळावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी संभाव्य संशयितांवर नजर ठेवणे, स्थानिक गस्त वाढवणे व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची पुन्हा पडताळणी करणे, अशा उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
Comments are closed.