अचानक बदलल्या कॉल सेटिंग्ज – हॅकिंग की अपडेट? जाणून घ्या खरी गोष्ट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अनेक अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्ते एकाच प्रश्नाने हैराण झाले आहेत – आपल्या फोनमधील कॉल सेटिंग्ज, डायलरचा इंटरफेस आणि कॉल रिसिव्ह डिस्प्ले अचानक बदलले कसे? स्वतः सेटिंग्जमध्ये कोणतीही छेडछाड न करता फोनमधील कॉल इंटरफेस बदललेला दिसल्याने वापरकर्त्यांमध्ये गोंधळ आणि चिंता वाढली आहे. काहींनी यामागे हॅकिंगचा संशय व्यक्त केला तर काहींनी राज्य संस्थांकडून पाळत ठेवण्याचा प्रकार तर नाही ना, अशी शंका मांडली. मात्र प्रत्यक्षात यामागे एक वेगळंच कारण असल्याचं स्पष्ट झालं आहे.
सोशल मीडियावरून हजारो लोकांनी आपल्या फोनमध्ये झालेल्या या अचानक बदलांचे अनुभव मांडले. ‘एक्स’सह (पूर्वीचं ट्विटर) अनेक प्लॅटफॉर्मवर लोकांनी स्क्रीनशॉट्स आणि व्हिडिओ शेअर करून विचारलं – “फोनमध्ये अचानक सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल झालं? कॉल सेटिंग्ज का बदलल्या?” काहींनी तर पोस्ट करत लिहिलं की, “हे बदल खरोखरच धोकादायक आहेत का? आपला डेटा सुरक्षित आहे का?”
तज्ज्ञांच्या मते, हे बदल हॅकिंगमुळे किंवा गुप्तहेरगिरीमुळे नव्हेत, तर गुगलने जारी केलेल्या फोन अॅपच्या ऑटो-अपडेटमुळे झाले आहेत. वनप्लससह अनेक मोबाईल कंपन्यांनी अधिकृतपणे सांगितले आहे की, कॉल डायलर व इंटरफेसमधील नवे डिझाइन हे गुगलच्या अपडेटचा भाग आहे. त्यामुळे वापरकर्त्यांनी घाबरण्याचे कारण नाही.
तथापि, ज्यांना फोनमधील आधीची जुनी शैली आवडत असेल, त्यांच्यासाठी एक पर्याय उपलब्ध आहे. फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन संबंधित अॅपवरील ‘अनइन्स्टॉल अपडेट्स’ हा पर्याय निवडल्यास कॉल डिस्प्ले पुन्हा पूर्वीसारखा करता येऊ शकतो. यामुळे फोन पूर्वीच्या स्टाईलमध्ये वापरणं शक्य होतं.
महत्त्वाचं म्हणजे, या बदलांचा तुमच्या डेटा सुरक्षा किंवा कॉल रेकॉर्डिंगशी थेट संबंध नाही. हे फक्त सॉफ्टवेअर इंटरफेसमधील अपडेट्स आहेत. मात्र अँड्रॉइड फोनमध्ये अशा प्रकारचे बदल वारंवार होत राहतात आणि ते वापरकर्त्यांना पूर्वसूचना न देता लागू होतात. त्यामुळे पुढे अशा प्रकारचे बदल टाळायचे असतील तर ऑटो-अपडेट्स डिसेबल करून ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
थोडक्यात –
अचानक बदललेल्या कॉल सेटिंग्जमागे हॅकिंग नव्हे तर गुगल अॅप अपडेट कारणीभूत
वनप्लससह कंपन्यांनी स्पष्ट केले – काळजी करू नका, हा नियमित अपडेट आहे..
जुन्या डायलर स्टाईल हवी असल्यास ‘अनइन्स्टॉल अपडेट्स’ पर्याय उपलब्ध..
ऑटो-अपडेट बंद केल्यास भविष्यात अशा प्रकारचे बदल टाळता येतील..
Comments are closed.