आदर्श महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ रॅलीचा जल्लोष
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, १३ ऑगस्ट :
स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार गोंडवाना विद्यापीठ संलग्न आदर्श पदवी महाविद्यालयाच्या वतीने आज सकाळी “हर घर तिरंगा” रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यापीठ परिसरातून सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या रॅलीने गडचिरोली शहराला देशभक्तीच्या रंगात रंगवले.
विद्यार्थ्यांनी “भारत माता की जय”, “हर घर तिरंगा… घर घर तिरंगा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. हातात तिरंगा, चेहऱ्यावर देशप्रेमाचा तेज आणि पावलोपावली देशसेवेचा संकल्प यांचा संगम पाहायला मिळत होता. रॅलीदरम्यान नागरिकांना १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले, तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
विद्यापीठ परिसरातून सुरू झालेली ही रॅली कलेक्टर कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा सत्र न्यायालय या मार्गाने पुढे सरकत पुन्हा महाविद्यालयात परतली. राष्ट्रीय एकात्मता, स्वातंत्र्याचा अभिमान आणि तरुणाईचा देशसेवा संकल्प यांचा संदेश देणे हे या रॅलीचे मुख्य उद्दिष्ट होते.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. श्याम खंडारे, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. अंतबोध बोरकर, प्रा. मनिषा पिपरे, सुदर्शन जानकी, प्रा. प्रणिता चंदनखेडे, प्रा. अजय राठोड, प्रा. नितीन चौधरी, प्रा. ऋतिक कोहळे, प्रा. मंगेश कडते, प्रा. पंकज राऊत, प्रा. मनोज बिरहारी, प्रवीण गिरडकर यांसह शिक्षकवृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
Comments are closed.