Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

समाजाला आर्थिक शिस्त लावण्याची जबाबदारी सीएंची-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नागपुर 30 – भारताला आत्मनिर्भर बनवायचे असेल आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था व्हायचे असेल तर आर्थिक परिवर्तन होणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योग, कृषी, सेवा यासारख्या प्रत्येक क्षेत्रासह समाजाला देखील आर्थिक व्हिजन ठेवून पुढे जावे लागेल. हे आर्थिक व्हिजन देण्याची आणि समाजाला आर्थिक शिस्त लावण्याची जबाबदारी चार्टर्ड अकाऊंटन्ट्सची (सीए) आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरातील रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात आयोजित ‘नॅशनल कॉन्फरन्स अॉफ सीए स्टुडंट्स’ या कार्यक्रमाच्या समारोप समारंभा प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ट शिक्षणतज्ज्ञ डॉ. वेदप्रकाश मिश्रा, सीए असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयदीप शहा, सीए अक्षय गुल्हाने, तृप्ती भट्टड, अभिजित केळकर, दिनेश राठी आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्ययन, श्रम, ज्ञान आणि गुणवत्तेच्या जोरावर चार्टर्ड अकाउंटंट्स होता येते. केवळ जीएसटी आणि इन्कम टॅक्सपुरता सीएंचे महत्त्व नाही. समाजाला आर्थिक नियोजन देण्याचे काम ते करीत असतात, असेही गडकरी म्हणाले. ‘देशाच्या प्रगतीतील महत्त्वाचा घटक असलेल्या आर्थिक विकासाचा थेट संबंध सीएंसोबत आहे. उद्योग, कृषी व सेवा क्षेत्राच्या प्रगतीच्या जोरावर देशाचा आर्थिक विकासदर वाढविण्याची आणि एकूणच व्यवस्थेला गती देण्याची सीएंवर मोठी जबाबदारी आहे, असेही गडकरी म्हणाले. देश सुखी संपन्न होण्यासाठी हॅपी ह्युमन इंडेक्स महत्त्वाचा आहे, याचाही उल्लेख त्यांनी केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.