Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गॅस टंचाईने चंद्रपूर त्रस्त; वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या, चुली पेटवून सरकारला इशारा

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : घरगुती गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत असताना, या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडण्यात आले. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तनुजा रायपुरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी थेट चुली पेटवून स्वयंपाक करत प्रतिकाराची ठिणगी पेटवली.

गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्वयंपाकासारख्या मूलभूत गरजेसाठीही पर्याय शोधण्याची वेळ सामान्य कुटुंबांवर येत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. आंदोलनकर्त्यांनी “नरेंद्र कब देगा सिलेंडर?” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत केंद्र आणि राज्य सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आंदोलकांच्या मते, आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव, विशेषतः आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम आता स्थानिक पातळीवर जाणवू लागले आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवरही गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करण्यात आला. “जनतेच्या स्वयंपाकघरात अंधार पसरला असताना सत्ताधारी मात्र निष्क्रिय आहेत,” अशी टीका आंदोलनकर्त्यांनी केली.

या आंदोलनाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, प्रतीकात्मक घोषणांपुरते मर्यादित न राहता कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष चुलीवर स्वयंपाक करून ‘गॅस अभावी जगण्याची वेळ’ प्रशासनासमोर उभी केली. हा प्रकार प्रशासनासाठी इशारा ठरावा, असा स्पष्ट संदेश देण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधले असले, तरी प्रत्यक्षात गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणती तातडीची पावले उचलली जातात, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.