खताची साठेबाजी करणार्या दोघांवर गुन्हा दाखल, 1.42 लाख किमतीचे रासायनिक जप्त
गोंदिया दि, 23 जानेवारी: जिल्ह्यात रासायनिक खतांचा तुटवडा व काळाबाजार होऊ नये, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने धाडसत्र राबविण्यात येत आहे. यातंर्गत 23 व 24 जानेवारी रोजी धाडसत्र राबवून गोरेगाव तालुक्यातील बबई येथे खत साठेबाजी करणार्या दोघांवर गुन्हे दाखल करुन 1.42 लाख किमतीचे रासायनिक खत जप्त करण्यात आले.
जिल्हा कृषी विभागाद्वारे दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील खताचे नियोजन करण्यात येते. तसेच खतांचा तुटवडा होऊ नये व काळाबाजार होऊ नये, यासाठी धाडसत्र राबविले जाते. यंदाही ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यातंर्गत यंदा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली धाडसत्र राबवित असताना गोरेगाव तालुक्यातील बबई येथे विक्री करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या रासायनिक खतांचा अवैधसाठा असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे 23 व 24 जानेवारी रोजी पाळत ठेवून बबई येथील एका घरातून किसान प्लस (20:20:05) या रासायनिक खताच्या 127 बॅग जप्त करुन गोरेगाव पोलिस ठाण्यामध्ये जमा करण्यात आल्या.
या खताची किंमत 1.42 लाख रुपये आहे. याप्रकरणी श्री किसान बायो एग्रीटेक, जबलपूरचे अभिकर्ता व ज्याच्या घरी खताचा साठा सापडला, त्याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, गोरेगाव तालुका कृषी अधिकारी व गोरेगाव पंसचे कृषी अधिकारी यांच्या पथकाने पार पाडली.
Comments are closed.