Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चिचडोह बॅरेजचे दरवाजे ३० जूनला उघडणार — वैनगंगा नदीत मोठा विसर्ग; नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाचा इशारा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, २८ जून : चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीवर वसलेले चिचडोह बॅरेज पुन्हा एकदा प्रवाहात खोल उसळी घेणार आहे. ३० जून रोजी सकाळी ८ वाजता या बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्यात येणार असून, नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणार आहे. परिणामी, नदीलगतच्या गावांमध्ये पूरस्थितीची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांनी सतर्कता आणि सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले दरवाजे आता टप्याटप्याने उघडले जाणार असून, ३९०.१० क्युमेक्स पाणी विसर्ग केला जाणार आहे. ही कारवाई गोसिखुर्द धरणातून वाढत्या विसर्गासह पाणलोट क्षेत्रातील नैसर्गिक येवामुळे आवश्यक ठरली आहे. सध्या बॅरेजमध्ये १८१.८० मीटर पातळी आणि ३८.५७ दशलक्ष घनमीटर जलसाठा असून, ही मर्यादा लवकरच ओलांडली जाऊ शकते, अशी शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या दरम्यान कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी चिचडोह बॅरेजलगतच्या सर्व गावांमध्ये इशारा जारी करण्यात आला आहे. विशेषत: नदीपात्रात उतरून आंघोळ करणारे, मासेमारी करणारे, रेती उत्खनन करणारे, पशुपालक आणि यात्रेकरू यांना तातडीने खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

प्रकल्पाच्या स्थापनेपासून आजवर चिचडोह बॅरेज हे केवळ सिंचनाच नव्हे, तर जीवनवाहिनी ठरले आहे. मात्र, नदीचं रूप जेव्हा बंधनातून मुक्त होतं, तेव्हा तिची धार ही सौंदर्य नव्हे, तर शक्ती असते. आणि याच शक्तीचा विस्फोट रोखण्यासाठी आता प्रशासन सज्ज आहे, तर नागरिकांनीही तितक्याच गंभीरपणे परिस्थितीचं भान ठेवावं, हे काळाचं आणि पाण्याचंही आवाहन आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की,”नदीपात्रात पाणीपातळी झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे आणि आपली व इतरांची सुरक्षितता जपावी.”

चिचडोह बॅरेजची रचना ६९१ मीटर लांब असून त्यात ३८ दरवाजे आहेत. हे दरवाजे १५ ऑक्टोबर २०२४ पासून बंद होते, आणि आता पुन्हा उघडण्याच्या टप्प्यावर आहेत. हा निर्णय प्रकल्प सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक ठरतो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.