विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण’ ज्ञानसभेचा समारोप; आदर्श शैक्षणिक संस्था उभारण्याचा निर्धार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर : गुणवत्ताधारित आणि समाजाभिमुख शिक्षणव्यवस्था उभारण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येणे ही काळाची गरज असून, आदर्श शैक्षणिक संस्था भविष्यातील दिशा ठरवतील, असे प्रतिपादन अतुल कोठारी यांनी केले. ‘विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण’ या विषयावर आयोजित महाराष्ट्र ज्ञान सभेच्या समारोपीय सत्रात ते बोलत होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, भारतीय प्रबंध संस्थान नागपूर आणि शिक्षण संस्कृती उत्थान न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय या राष्ट्रीय स्तरावरील ज्ञानसभेला सुमारे ५०० प्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी अतुल कोठारी होते. यावेळी डॉ. मनाली क्षीरसागर, डॉ. विजय माहेश्वरी, डॉ. अविनाश आवलगावकर, डॉ. प्रशांत बोकारे, डॉ. प्रेम लाल पटेल, डॉ. भीमराया मैत्री, डॉ. संजय कौशिक, डॉ. श्रीराम कावळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्ञानसभेच्या माध्यमातून ‘विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण’ या संकल्पनेला आता प्रत्यक्ष कृतीची जोड मिळणार असल्याचे कोठारी यांनी स्पष्ट केले. विविध चर्चासत्रांतून मांडण्यात आलेल्या प्रस्तावांचे सखोल परीक्षण करून व्यवहार्य आणि परिणामकारक मुद्दे पुढील कार्ययोजनेत समाविष्ट केले जातील, असेही त्यांनी सांगितले. “कार्यक्रमाचे खरे यश हे केवळ चर्चेत नसून त्या विचारांचे कृतीत रूपांतर करण्यात आहे,” असे ते म्हणाले.
उद्योग, शिक्षण आणि समाज या तिन्ही घटकांचा समन्वय साधून प्रादेशिक गरजांनुसार शिक्षणव्यवस्था उभारण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. प्रत्येक प्रदेशाच्या वेगळ्या सामाजिक-आर्थिक गरजांनुसार अभ्यासक्रम आणि शैक्षणिक धोरणे आखली गेल्यासच सर्वांगीण विकास साध्य होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात औपचारिकतेऐवजी आशयाला प्राधान्य देण्याचा सकारात्मक बदलही पाहायला मिळाला. बुके-हारांऐवजी पुस्तक देऊन सन्मान, प्लास्टिक वापरावर मर्यादा, तसेच सर्व पदाधिकारी आणि शिक्षकांनी संपूर्ण वेळ सक्रिय सहभाग नोंदवणे—या गोष्टींमुळे ‘शैक्षणिक कुटुंब’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र दिसून आले.
समारोपीय सत्रात पोस्टर सादरीकरण स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. त्रिशा प्रामाणिक हिने प्रथम, लावण्या चौधरी हिने द्वितीय, तर आर्या संत हिने तृतीय क्रमांक पटकावला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आढावा डॉ. मनाली क्षीरसागर यांनी मांडला, तर आभार डॉ. प्रशांत बोकारे यांनी मानले. संचालन डॉ. अलिषा सहाय आणि निखिल सरदेसाई यांनी केले.

