Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तळीरामांना कोरोना लवकर होतो – फडणवीसांचे गायकवाडांना सडेतोड उत्तर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. १९ एप्रिल: राज्यात कोरोनाने थैमान घातला आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी ‘मला कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते, असे विधान केले होते. दरम्यान, संजय गायकवाड यांना आता देवेंद्र फडणवीस यांनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे. संजय गायकवाड यांच्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी, ‘संजय गायकवाड यांनी रात्रीची उतरली नसताना पत्रकार परिषद घेतली असावी. मात्र मी त्यांना विनंती करतो की, माझ्या घशात कोरोनाचे किटाणू घालण्याआधी त्यांनी हँडग्लव्हज घालावेत आणि चेहऱ्यावर नीट मास्क लावावा. कारण काय आहे की, मला जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे मला काही होणार नाही. मात्र माझ्या माहितीप्रमाणे सामान्य माणसापेक्षा तळीरामांना कोरोना लवकर होतो,’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

दरम्यान, रेमडेसिविरवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये झालेला संघर्ष तीव्र झाला असताना शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. फडणवीस यांच्यावर टीका करताना गायकवाड यांनी पातळी सोडली होती. ‘तुमच्या सरकारमुळे लाखो लोक मरतील त्याचं काय? ज्याचा घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरात जीव जातो, त्याला समजतं की कोरोना काय आहे? मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते,’ असे गायकवाड म्हणाले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.