Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यात ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी, ६९ तहसील कार्यालयांची निर्मिती

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई : राज्यातील वाढती लोकसंख्या, शहरांचा झपाट्याने होत असलेला भौगोलिक विस्तार आणि त्यातून महसूल विभागाच्या कामकाजावर पडणारा वाढता ताण लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील सहा महसूल विभागांत ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी पदांची तसेच ६९ अतिरिक्त तहसील कार्यालयांची नव्याने निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. प्रशासन नागरिकांच्या दारी पोहोचावे आणि महसूल यंत्रणा अधिक परिणामकारक व्हावी, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

पुणे विभागात सर्वाधिक म्हणजे तीन अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमले जाणार असून, उर्वरित विभागांत प्रत्येकी एक अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यरत होणार आहेत. पुणे जिल्ह्यात बारामती येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, तर चाकण येथे अतिरिक्त तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनातील वाढता व्याप, नागरिकांना विविध महसूल सेवांसाठी करावी लागणारी दूरची धावपळ, तालुक्यांचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या या पार्श्वभूमीवर दीर्घकाळापासून अतिरिक्त कार्यालयांची मागणी होत होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करताना संबंधित तालुक्यांची संख्या, लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ, आदिवासी व दुर्गम भागांचा समावेश, जिल्हा मुख्यालयापासूनचे अंतर तसेच सर्वात दूरच्या गावांचे अंतर यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. प्रस्तावित कार्यालये कार्यान्वित झाल्यानंतर नागरिकांना मुख्यालयापर्यंत करावी लागणारी प्रवासाची कसरत लक्षणीयरीत्या कमी होणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये पुढीलप्रमाणे …

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पुणे विभागात पुणे जिल्ह्यात बारामती, सातारा जिल्ह्यात फलटण, सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन होणार आहेत. कोकण विभागात ठाणे जिल्ह्यात कल्याण आणि रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे ही कार्यालये सुरू होतील. नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, संभाजीनगर विभागात नांदेड जिल्ह्यात किनवट, अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यात अचलपूर, यवतमाळ जिल्ह्यात पुसद आणि बुलडाणा जिल्ह्यात खामगाव येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यरत होतील. नागपूर विभागात नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर येथे नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होणार आहे.

विदर्भातील नवीन तहसील कार्यालयांचा विस्तार ..

विदर्भात महसूल यंत्रणा बळकट करण्यासाठी अनेक तालुक्यांत नवीन तहसील कार्यालये उभारली जाणार आहेत. अमरावती विभागात अमरावती (ग्रामीण), अकोला (शहर), उमरखेड, सिंदखेड राजा, मेहकर, खामगाव, रिसोड, कारंजा आदी ठिकाणी कार्यालयांची उभारणी होणार आहे. नागपूर विभागात हिंगणा, नागपूर, कामठी, सावनेर, नरखेड, मौदा, कुही, हिंगणघाट, सेलू या तालुक्यांतील विविध गावांचा समावेश करण्यात आला आहे. गडचिरोली परिसरातील चामोर्शी, कुरखेडा, आरमोरी, धानोरा, एटापल्ली, अहेरी या दुर्गम तालुक्यांतील मालेवाडा, वैरागड, पेंढरी, सिंरोचा, आसरअल्ली, कसनसूर, जिमलगट्टा यांसारख्या भागांत तहसील कार्यालयांची निर्मिती प्रस्तावित आहे.

या निर्णयामुळे विशेषतः आदिवासी आणि दुर्गम भागांतील नागरिकांना जमीन अभिलेख, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्रे, आपत्ती निवारण प्रस्ताव यांसारख्या कामांसाठी जिल्हा मुख्यालयाची धाव घेण्याची गरज कमी होणार आहे. प्रशासनिक विकेंद्रीकरणाच्या दिशेने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असले, तरी नव्या कार्यालयांसाठी आवश्यक मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि निधी वेळेत उपलब्ध झाला तरच या निर्णयाचे खरे फलित नागरिकांना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महसूल व्यवस्थेच्या या विस्तारामुळे शासन-नागरिक अंतर कमी होणार की केवळ कागदोपत्री वाढ होणार, याची कसोटी येत्या काळात लागणार आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेला हा निर्णय राज्याच्या प्रशासकीय रचनेत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.