अहेरीत CRPF चा ‘शौर्य दिवस’—वीरांच्या पराक्रमाची गर्जना पुन्हा दुमदुमली!
लोस्कपर्श न्युज नेटवर्क
अहेरी, दि. ९ एप्रिल — देशाच्या सीमांवर जागता पहारा देणाऱ्या आणि प्रत्येक संकटासमोर छातीठोक उभ्या राहणाऱ्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) जवानांनी आज अहेरीतील ३७ व्या बटालियन मुख्यालयात ‘शौर्य दिवस’ अशा दिमाखदार, प्रेरणादायी आणि अंगावर शहारे आणणाऱ्या वातावरणात साजरा केला की, तो केवळ एक कार्यक्रम न राहता देशभक्तीचा जिवंत घोष ठरला.
पहाटेच्या शांततेत ‘शहीद स्मारक’ येथे श्रद्धांजली अर्पण करत कार्यक्रमाची सुरुवात झाली. मातृभूमीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृतींना अभिवादन करताना उपस्थित प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती—“देशासाठी जगायचं आणि गरज पडली तर देशासाठी मरण्याचं!” त्या क्षणी वातावरण भारलेलं होतं, आणि शौर्याची परंपरा जणू पुन्हा सजीव झाली होती.
यानंतर झालेल्या विशेष सैनिक संमेलनात कार्यवाहक कमांडंट सुजीत कुमार यांनी ०९ एप्रिल १९६५ च्या ऐतिहासिक पराक्रमाची आठवण करून दिली. सीआरपीएफच्या ०२ व्या बटालियनने त्या दिवशी दाखवलेलं धैर्य हे केवळ एक युद्धप्रसंग नव्हतं, तर भारताच्या सुरक्षेच्या इतिहासातील एक अजरामर अध्याय ठरला. पाकिस्तानच्या संपूर्ण ब्रिगेडला भारतीय सीमेत घुसण्यापासून रोखत तब्बल १२ तास जीवाची बाजी लावून लढणाऱ्या त्या वीरांनी दाखवलेली जिद्द आजही प्रत्येक जवानाच्या रक्तात सळसळते, असे त्यांनी ठाम शब्दांत सांगितले.
“आम्ही फक्त गणवेश घालत नाही, आम्ही राष्ट्राची जबाबदारी अंगावर घेतो,” या ओजस्वी भावनेतून कमांडंट महोदयांनी सर्व जवानांना शपथ दिली. देशाच्या एकात्मतेसाठी, सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्धार प्रत्येक जवानाने पुन्हा एकदा मनाशी पक्का केला.
या प्रसंगी शौर्य पदक विजेत्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना केवळ शब्दच नाही, तर संपूर्ण बटालियनचा अभिमान त्यांच्या सन्मानात झळकत होता. त्यांच्या कार्यामुळे नव्या जवानांमध्ये प्रेरणेचा दीप प्रज्वलित झाला, तर अनुभवी जवानांमध्ये नव्या जोमाने काम करण्याची ऊर्जा निर्माण झाली.
डेप्युटी कमांडंट अनिल चंद्रमोरे, असिस्टंट कमांडंट अविनाश चौधरी यांच्यासह सर्व अधिकारी व जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात “भारत माता की जय” आणि “वीर जवान अमर रहे” च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले.

