गडचिरोली जिल्ह्यात २३ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू; प्रशासनाचा खबरदारीचा उपाय
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १६ ऑक्टोबर : आगामी काळात जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष, संघटना आणि नागरिकांकडून शासनाच्या धोरणांविरोधात आंदोलने, मोर्चे किंवा सभा आयोजित होण्याची शक्यता गृहित धरून गडचिरोली जिल्हा प्रशासनाने सर्वंकष खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाभर जमावबंदी लागू केली आहे. जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये हा आदेश जारी केला असून, तो २३ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्रीपासून ६ नोव्हेंबर २०२५ रोजी मध्यरात्रीपर्यंत प्रभावी राहणार आहे.
या आदेशानुसार जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीस शस्त्र, लाठ्या, सोटे, तलवारी, भाले, बंदुका किंवा शरीरास इजा पोहोचवू शकतील अशी कोणतीही हत्यारे, तसेच दाहक अथवा स्फोटक पदार्थ सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी समाजात तणाव निर्माण होईल किंवा असंतुलन घडवेल अशा प्रकारच्या घोषणा, बॅनर, प्रदर्शन, प्रतिमा किंवा अशोभनीय निदर्शने यांनाही प्रतिबंध घालण्यात आला आहे.
जमावबंदीच्या कालावधीत सार्वजनिक रस्ते, चौक, चावडी यांसारख्या ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, मोर्चा किंवा मिरवणूक काढणे, सभा किंवा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणे यासाठी संबंधित उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा स्थानिक पोलीस अधिकारी यांची पूर्वपरवानगी अनिवार्य राहील.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शांतता अबाधित ठेवण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला असून नागरिकांनी प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हादंडाधिकाऱ्यांनी केले आहे.