“चॉकलेट-लॉलीपॉपचा केक कापा!” — फडणवीसांच्या वाढदिवशी काँग्रेसचा टोला; समस्यांनी ग्रासलेल्या जनतेकडून अनोखा विरोध
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसने केलेली घोषणा आता राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. २२ जुलै रोजी गडचिरोली काँग्रेस कार्यालयासमोर “लॉलीपॉप आणि चॉकलेट वाटप आंदोलन” राबवून, जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. हा कार्यक्रम फक्त विरोधासाठीचा विरोध नसून, जिल्ह्यातील खोलवर रुजलेल्या असंतोषाचे दृश्य प्रतिनिधित्व ठरणार आहे.
फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच, काँग्रेसने अत्यंत उपरोधिक शैलीत प्रश्न उपस्थित केला आहे — “विकासाच्या नावाने देवा भाऊ, तुम्ही मारल्या थापा; पुन्हा या, पुन्हा या… आणि चॉकलेट लॉलीपॉपचा केक कापा!” या घोषवाक्यातून काँग्रेसने विकासाच्या केवळ घोषणाबाजीकडे निर्देश करत, प्रत्यक्ष अंमलबजावणीतील अपयशावर बोट ठेवलं आहे.
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री पालकमंत्री असताना जिल्ह्यातील युवक, महिला, शेतकरी, आदिवासी यांच्या व्यथा प्रत्यक्ष ऐकायला मुख्यमंत्री एकदाही थांबले नाहीत. प्रत्यक्ष संवादाऐवजी त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा कागदी लाडू झाला आहे. त्या संदर्भात काँग्रेसने चक्क चॉकलेट आणि लॉलीपॉपचे प्रतीक वापरून ‘अस्वस्थ आश्वासनांचा गोड आवरण’ फोडण्याचा प्रयत्न केला आहे. या निषेध आंदोलनात सहभागी असलेली यादी स्वतःच एक व्यथा-चित्र आहे..
रानटी हत्तीच्या हल्ल्यात पीडित झालेले शेतकरी, पूरग्रस्त नागरिक, डिमांड भरूनही विद्युत मीटर मिळाले नसलेले शेतकरी, कर्जमाफी व बोनसाच्या प्रतीक्षेत असलेले लाभार्थी, घरकुल योजनेचे थकीत हप्ते भरणाऱ्यांची निराशा, रोजगारासाठी वणवण भटकणारे पदवीधर, ट्रक वितरणाच्या घोषणेत फसवणूक झालेल्या आदिवासी युवकांचा संताप, जबरदस्तीने जमीन गमावलेले शेतकरी, वृक्षतोडीला विरोध करताना दडपशाहीला तोंड देणारे पर्यावरण कार्यकर्ते, अपघातग्रस्त नागरिक, पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने त्रस्त जनता, बंद झालेल्या शाळांमुळे शिक्षणापासून वंचित झालेले विद्यार्थी, एसटी बस सेवांच्या अभावामुळे त्रासलेली जनता, वर्दळीच्या रस्त्यांवरून होणाऱ्या मृत्यूंची मालिका आणि नियोजित मेडिकल कॉलेजची पदभरती रखडलेली असलेले युवक.
ही सगळी यादी म्हणजे एखाद्या जिल्ह्याच्या व्यथा-नोंदवहीसारखी आहे. आणि काँग्रेसने त्या वेदनांचा उद्गार एका उपरोधिक, पण स्पष्ट राजकीय भाषेत दिला आहे. जिल्ह्याच्या मुद्यांना केंद्रस्थानी ठेवून काँग्रेसने हा कार्यक्रम केवळ विरोध म्हणून केला नसून, फडणवीस सरकारच्या तथाकथित विकासाच्या दाव्यांना जनतेसमोर उघडं पाडण्याचा यामागे प्रयत्न असल्याचं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे.
राजकीय दृष्टिकोनातून पाहता, हा कार्यक्रम राजकीय प्रहसन नसून जनतेच्या उपेक्षेचा आवाज असल्याची भावना अनेक ठिकाणी उमटू लागली आहे. गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आश्वासन अनेकदा देण्यात आले, मात्र खऱ्या अर्थाने विकास कोणाचाही हातात लागलेला नाही, अशी तक्रार आता सामान्य माणूस उघडपणे व्यक्त करू लागला आहे.
Comments are closed.