Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ओशोंच्या समाधीचे दर्शन हा आमचा संविधानिक अधिकार

आचार्य रजनीश यांच्या ३३ व्या पुण्यतिथीदिनी ओशो भक्तांचे आश्रम व्यवस्थापनाच्या मुजोरी विरोधात आंदोलन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

पुणे  19 जानेवारी :-  आचार्य ओशो रजनीश यांच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी ओशोंच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी देशभरातून आश्रमाच्या परिसरात दाखल झालेल्या ओशो भक्तांना आश्रम व्यवस्थापनाकडून (ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन) समाधीस्थळी जाण्यास, तसेच ओशो यांची माळ घालण्यास बंदी घालण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने भक्तांना समाधीचे दर्शन घेण्यापासून रोखता येणार नाही, असा निर्णय दिलेला असतानाही व्यवस्थापनाकडून मुजोरी सुरु आहे. याविरोधात ओशो भक्तांनी गुरुवारी ओशो आश्रमाच्या गेटसमोर निषेध आंदोलन केले. स्वामी चैतन्य कीर्ती यांच्यासमवेत माँ धर्म ज्योती, स्वामी योग सुनील, माँ आरती, स्वामी मनोज व शेकडो ओशो भक्त या आंदोलनात सहभागी झाले.

“आचार्य रजनीश अर्थात ओशो हे आमचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्या समाधीचे दर्शन घेणे हा आमचा संविधानिक अधिकार आहे. त्यांचे छायाचित्र असलेली माळ घालून आश्रमात प्रवेश करण्यास कोणीही मज्जाव करू शकत नाही. मुंबई उच्च न्यायालयानेही समाधीच्या दर्शनापासून कोणत्याही भक्ताला रोखू नये, असे निर्देश दिलेले असतानाही ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनच्या व्यवस्थापनाकडून मुजोरी सुरु आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया ओशो भक्तांच्या वतीने ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनचे माजी विश्वस्त व ‘ओशो वर्ल्ड’चे संपादक स्वामी चैतन्य कीर्ती यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

स्वामी चैतन्य कीर्ती म्हणाले, “ओशो यांचा जन्म व मृत्यचे स्थळ, समाधी भारतात आहे. त्यांनी सर्वाधिक काळ भारतात घालवला. मात्र ओशोंची बौद्धिक संपदा, पुस्तके, ध्वनिफिती, दृकश्राव्य फिती, ट्रस्टची मालमत्ता या सर्वांचे मान्यता अधिकार मात्र पाश्चिमात्यांकडे आहेत. झुरीच येथे ओशो इंटरनॅशनलचे मुख्यालय नेण्यात आले असून, सगळ्या गोष्टींचा लाभही तिथेच जात आहे. ओशोंचे विचार लोकांपर्यंत पोहचू न देता भक्तांवर अनेक बंधने लादण्यात येत आहेत. ओशोंच्या बौद्धिक संपदेवर हक्क सांगत त्या साहित्यातून मिळणारा संपूर्ण पैसा बाहेरच्या देशात पळवला जात आहे. भारतीय ओशो आश्रमांना विशेषतः पुण्यातील आश्रमाला त्यातून काहीही उत्पन्न मिळत नाही. उलट ते येथील व्यवस्थापनावर आपले वर्चस्व दाखवत आहेत. आश्रमाच्या मालमत्ता विकण्याचा प्रयत्न होत आहे. हे सर्व ओशोंचे विचार संपविण्याचे षडयंत्र आहे,” असा आरोपही ओशो भक्तांनी यावेळी केला.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.