Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धर्मरावबाबा आजमावणार स्वबळ, चामोर्शीतून फुंकणार रणशिंग

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा तापमान वाढवणारा स्फोटक सूर आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सुतोवाच केल्यापासून राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. नुकतेच सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्यावर त्यांनी थेट निशाणा साधत सरकारच्या धोरणांवर टीका केली आणि येत्या निवडणुकांसाठी स्वबळावर रणशिंग फुंकण्याची तयारी दाखवली.

१२ ऑक्टोबर रोजी चामोर्शी येथे धर्मरावबाबा ‘जनकल्याण यात्रा’च्या माध्यमातून आपले राजकीय शक्तिप्रदर्शन करणार आहेत. या सभेतून ते स्वबळावरच्या लढाईचा बिगुल वाजवतील, अशी चिन्हं स्पष्ट दिसू लागली आहेत. जिल्हाभरातून कार्यकर्त्यांचा आणि समर्थकांचा मोठा जनसागर या सभेत जमणार असल्याची चर्चा आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री म्हणून कार्यरत राहिलेल्या धर्मरावबाबांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याचे बोलले जाते. मात्र नाराजीला संघटनाच्या बळात परिवर्तित करत त्यांनी गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे. जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि पंचायत समित्यांच्या आरक्षण घोषणेनंतर धर्मरावबाबांनी गडचिरोलीपासून अहेरीपर्यंत स्वतंत्र बैठकी घेत स्थानिक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

चामोर्शीतील सभा या सर्व घडामोडींना निर्णायक वळण देणारी ठरणार आहे. भाजप, काँग्रेस आणि शरद पवार गट या तिन्ही पक्षांचा प्रभाव असलेल्या चामोर्शी येथे सभा घेऊन धर्मरावबाबांनी राजकीयदृष्ट्या धाडसी पाऊल टाकले आहे. ही केवळ सभा नाही तर एकाच वेळी तीन दिशांना दिलेला राजकीय इशारा मानला जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जनकल्याण यात्रेच्या या मेळाव्यात आमदार अमोल मिटकरी, महिला नेत्या रूपाली चाकणकर आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांची उपस्थिती या कार्यक्रमाला विशेष उठाव देणार आहे. चामोर्शी शहरात सभेच्या तयारीला वेग आला असून, पोस्टर, बॅनर आणि मोटरसायकल रॅलींमुळे राजकीय तापमान शिगेला पोहोचले आहे.

धर्मरावबाबा आत्राम हे नेहमीच संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व. आदिवासी समाजातील प्रश्नांना प्राधान्य देणारे, जनतेशी थेट नाळ जोडणारे आणि सत्तेपेक्षा स्वाभिमानावर ठाम राहणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. या पार्श्वभूमीवर १२ ऑक्टोबरची चामोर्शी सभा ही केवळ राजकीय कार्यक्रम नसून धर्मरावबाबांच्या स्वबळाच्या नव्या राजकीय प्रवासाचा उद्घोष ठरणार आहे.

स्वबळाची गर्जना, रणशिंगाचा बिगुल…

धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण केलं आहे. १२ ऑक्टोबरला चामोर्शीत होणाऱ्या जनकल्याण यात्रेतून ते स्वबळावरच्या लढाईचं रणशिंग फुंकणार आहेत. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्यावर केलेल्या टीकेनंतर त्यांच्या सभेकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. मंत्रिपद न मिळाल्यानंतर संघटनशक्तीच्या बळावर त्यांनी स्वतंत्र राजकीय समीकरणं तयार केली आहेत. या सभेतून जिल्ह्यातील तीनही प्रमुख पक्षांना थेट आव्हान देण्याची शक्यता आहे. चामोर्शीची सभा ही धर्मरावबाबांच्या नव्या राजकीय अध्यायाची सुरुवात ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.