ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक अभ्यासक्रमातून २५ युवकांना थेट नोकरी
कौशल्याधारित प्रशिक्षणातून गडचिरोलीच्या रोजगारवाढीला गती....
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १ :
बदलत्या कृषी व औद्योगिक अर्थव्यवस्थेत युवकांना तात्काळ रोजगारक्षम बनविण्यासाठी अल्पमुदतीचे, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. गडचिरोली येथील क्रांतिवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे राबविण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक’ या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २५ युवकांना थेट रोजगार मिळाल्याने जिल्ह्यातील कौशल्याधारित रोजगारनिर्मितीला नवी दिशा मिळाली आहे.
या प्रशिक्षणार्थींना नियुक्तीपत्रांचे वितरण दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडलेल्या कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी मंत्री लोढा ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते. कार्यक्रमास राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, राज्य नाविन्यता सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माळी, तसेच महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनीच्या कौशल्य विकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉन लुईस आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री लोढा म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यात रोजगारनिर्मितीला गती मिळत असून, येत्या पाच वर्षांत हा जिल्हा राज्यातील वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक ठरेल. गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल भागात युवकांना दीर्घकालीन शिक्षणासोबतच तात्काळ रोजगार देणारे अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. ‘ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक’सारखे अभ्यासक्रम युवकांना थेट उद्योगाशी जोडतात. लोहखनिज व अन्य औद्योगिक गुंतवणुकीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग उभे राहत असून, त्या अनुषंगाने कुशल मनुष्यबळाची निर्मिती गरजेची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. औद्योगिक प्रकल्पांना गती देताना स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळणे हे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी नमूद केले. सामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या सेवा व सुविधा सुलभपणे पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी दर महिन्याला जिल्ह्याला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक युवकांच्या कौशल्यवृद्धीवर भर…
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले की, गडचिरोलीत येणाऱ्या गुंतवणुकीचा जास्तीत जास्त लाभ स्थानिक युवकांना मिळावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. युवकांची क्षमता वृद्धी (Capacity Building) वाढविण्यावर भर देण्यात येत असून, आयटीआय–उद्योग सहकार्याच्या माध्यमातून युवकांना थेट रोजगाराशी जोडण्याचे उपक्रम राबविले जात आहेत. ‘ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक’ प्रशिक्षण हा त्याचा उत्तम नमुना असल्याचे त्यांनी नमूद केले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरेश चौधरी यांनी प्रास्ताविकात माहिती देताना सांगितले की, हा अभ्यासक्रम ८ ऑक्टोबर ते १९ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आला. एकूण ३९० तासांचे, दररोज सहा तासांचे सघन प्रशिक्षण देण्यात आले. ट्रॅक्टर दुरुस्ती, देखभाल तसेच आधुनिक तांत्रिक प्रणालींचे प्रात्यक्षिक ज्ञान प्रशिक्षणार्थींना देण्यात आले. ३० प्रशिक्षणार्थ्यांपैकी २५ युवक यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.
कार्यक्रमात उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी मयूर बुरले व संयोग कोहळे यांनी आपले अनुभव मांडले. प्रशिक्षण काळात जिल्हा प्रशासनाने भोजनाची व्यवस्था, तर आयटीआय गडचिरोलीने निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनीने प्रशिक्षणासाठी आवश्यक यंत्रसामग्री व तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध करून दिले.
कार्यक्रमाचा समारोप कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी आभार प्रदर्शन करून केला. यावेळी कौशल्य विकास विभाग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते


Comments are closed.