Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पीक विमा व अन्न प्रक्रिया योजनांमध्ये सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली :शेतकऱ्यांच्या संकटसमयी आधारभूत ठरणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ३१ जुलैपूर्वी नोंदणी करून अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी पीक विमा आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नती योजनेच्या अंमलबजावणीची सखोल तपासणी केली.

बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, कृषी विकास अधिकारी खोमणे, अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत ढोंगले आदी उपस्थित होते. खरीप २०२५ साठी सुरू असलेल्या पीक विमा योजनेत अर्ज संख्येची अपेक्षित वाढ न झाल्याचे दिसून आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत ग्रामस्तरावरील अधिकारी, कर्मचारी आणि बँक प्रतिनिधींना नोंदणी प्रक्रिया गतीमान करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचण्यासाठी गावपातळीवर जनजागृती मोहीम, मदत केंद्रांची स्थापना आणि बँक व कृषी विभागाचे संयुक्त प्रयत्न करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

ग्रामीण उद्योगांसाठी संधी — PMFME योजनेतील विलंबावर जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नती योजना ही ग्रामीण भागातील लघुउद्योजक, महिला बचत गट आणि तरुण शेतकरी उद्योजकांसाठी आर्थिक बळकटीची मोठी संधी आहे. मात्र, बँक प्रक्रियेतील विलंबामुळे अंमलबजावणी संथ असल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकारी पंडा यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सर्व बँक शाखा प्रमुखांना प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले.

या योजनेमुळे अन्न प्रक्रिया, फळे-भाजीपाला प्रक्रिया, सुकी मनेजमेंट, लोकल उत्पादनांचे ब्रँडिंग व विक्री यासारख्या क्षेत्रांत नवउद्योजकांना चालना मिळू शकते, असे स्पष्ट करत त्यांनी योजनेची जनजागृती वाढवण्याचे आणि अर्ज प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

बैठकीस कृषी उपसंचालक मधुगंधा जुलमे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक किशोर झाडे, आत्मा, कृषी विभाग, विविध बँका आणि विमा कंपनीचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते….

Comments are closed.