डॉ. रवीकांत खोब्रागडे यांना ‘VPWA कर्तृत्व गौरव पुरस्कार’
ताडोबातील वन्यजीवांच्या रक्षणासाठी कर्तृत्वाची पावती...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव संरक्षण व पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने झटणारे पशुवैद्यकीय अधिकारी तथा रॅपिड रेस्क्यू टीमचे प्रमुख डॉ. रवीकांत एस. खोब्रागडे यांच्या कर्तृत्वाला प्रतिष्ठित ‘व्हेटरिनरी प्रॅक्टिशनर्स वेल्फेअर असोसिएशन (VPWA) कर्तृत्व गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा ११ जानेवारी रोजी नवी मुंबईतील सिडको कन्व्हेन्शन सेंटर, वाशी येथे उत्साहात पार पडला.
सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते डॉ. खोब्रागडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पशुवैद्यकीय, सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
वन्यजीवांवरील जखमा, आजार व आपत्कालीन स्थितीत केलेली तातडीची वैद्यकीय मदत, मानवी–वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये केलेले प्रभावी हस्तक्षेप तसेच पर्यावरण संवर्धनासाठी दिलेले सातत्यपूर्ण योगदान यामुळे डॉ. खोब्रागडे यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आल्याचे VPWA कडून स्पष्ट करण्यात आले.

VPWA च्या अभिनंदनपर मनोगतात डॉ. खोब्रागडे यांच्या कार्यनिष्ठा, व्यावसायिक कौशल्य आणि निःस्वार्थ सेवाभावाचा विशेष उल्लेख करण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव संरक्षण मोहिमांना बळ मिळाले असून, ही कामगिरी इतरांसाठी दिशादर्शक ठरत असल्याचे नमूद करण्यात आले.
या सन्मानामुळे चंद्रपूर जिल्ह्यासह ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर ठळक ओळख मिळाल्याची भावना वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

