Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकरी कामगार पक्षाचा गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्याविरोधात एल्गार.

तात्काळ बदली करुन जिल्हा विकासाचा मार्ग मोकळा करा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली दि. १० डिसेंबर: गडचिरोली जिल्ह्यातील, विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या आणि महापूर, दुष्काळाने मेटाकुटीस आलेली असून गडचिरोली जिल्ह्याचे सध्या कार्यरत जिल्हाधिकारी श्री. दिपक सिंगला हे शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या संबंधात हेकेखोरपणाची भुमिका घेवून कर्तव्य बजावत आहेत. तसेच शेतकरी आणि सामान्य नागरिक, आदिवासी बांधव यांच्या समस्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी यांनी केलेले पाठपुरावे, निवेदने, विनंतीपत्रे यांची कोणतीही दखल न घेता हेकेखोर पध्दतीने काम करणारे जिल्हाधिकारी श्री.दिपक सिंगला यांची तात्काळ बदली करुन जिल्हा विकासाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षातर्फे राज्याचे मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रामदास जराते शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य
तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस

शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, शेकाप युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की,जिल्हाधिकारी श्री.दिपक सिंगला यांनी,ते रुजू झाल्यापासून राबविलेली कार्यपद्धती ही फक्त प्रसिध्दीपुरतीची असल्याचे शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप प्रकरणी दिसून आलेले आहे.श्री.दिपक सिंगला यांच्या कार्यकाळात २०२०-२१ च्या हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अत्यंत मनस्ताप सहन करावा लागला आहे.ऑगष्ट महिण्यात जिल्ह्यातील पामुलगौतम, इंद्रावती, गोदावरी आणि वैनगंगा नदीला आलेल्या महापुराने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आपत्तीचे आभाळ कोसळले.याबाबत विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी जिल्हाधिकारी श्री.दिपक सिंगला यांचेकडे पीकनिहाय आणि प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने करून मदत देण्याकरिता केलेल्या पाठपुराव्याला त्यांनी केराची टोपली दाखवली.आणि प्रत्यक्ष नुकसानीच्या बदल्यात शासकीय मदतीपासून वंचित ठेवले.एवढेच नाही तर राज्य सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जावू नये म्हणून नुकसान भरपाईची रक्कम तातडीने दिलेली असतांनाही केवळ जिल्हाधिकारी श्री.दिपक सिंगला यांच्या अनास्थेमुळे राज्य सरकारची ही तातडीची मदत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दिवाळीपूर्वी जमा न झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली.हे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे दुर्दैव असल्याची टिकाही भाई रामदास जराते यांनी केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोवीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील जनता आर्थिक विवंचनेत असतांना जिल्हाधिकारी श्री.सिंगला यांनी जनतेच्या मदतीकरीता कोणतीही ठोस भूमिका न घेता केवळ आदेशांवर आदेश जारी करण्याचे काम केले.आणि दुसरीकडे याच काळात लाॅकडावूनचा फायदा घेऊन आरमोरी,वडसा,चामोर्शी,सिरोंचा,अहेरी, गडचिरोली तालुक्यांतून २० हजार ब्रासपेक्षा जास्त रेतीची तस्करी काही  तस्करांनी राजरोसपणे केली आणि ही रेती तेलंगणा, कर्नाटक राज्य तसेच लगतच्या चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात खोट्या टि.पी.च्या आधारे काळाबाजार केला.जिल्हाधिकारी श्री.दिपक सिंगला यांनी या प्रकाराकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केलेले आहे.एवढेच नव्हे तर मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव झालेला नसतांनाही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० आणि ३५३(सी) या रस्त्याच्या बांधकामात हजारो ब्रास रेतीचा उपसा करून वापर करण्यात येत असतांनाही जिल्हाधिकारी श्री.दिपक सिंगला यांनी डोळेझाकपणा करीत असून त्यांच्या या ‘अर्थपूर्ण’दुर्लक्षित कारभाराने जिल्ह्यातील इंद्रावती, गोदावरी, वैनगंगा,पोहार,अडाणी, खोब्रागडी या नद्यांची जैवपरिसंस्था आणि पर्यावरणीय संतुलन धोक्यात आलेले आहे.असा आरोपही या तक्रारीत भाई रामदास जराते यांनी केला आहे.

जिल्हाधिकारी श्री.दिपक सिंगला यांची ही भूमिका बघता जिल्ह्याला विकासाकडे नेणारे त्यांचे कार्य नसून तस्कर आणि अवैध कारभाराला ‘अर्थपूर्ण’ दिशेने गती देण्याचे आहे.जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीलाही ही भूमिका पुरक ठरल्याने छत्तीसगड, तेलंगणा राज्यातील दारू तस्करांना जिल्ह्यात अभय मिळाल्याची स्थिती आहे.जिल्हाधिकाऱ्यांना दिवसभर भेटणाऱ्यांमध्ये याच प्रकारच्या लोकांना प्राधान्याने वेळ दिला जात असल्याचा आम्हाला अनुभव आला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे विकासाच्या नावाखाली कारवाईचा बडगा उगारुन आपली ‘बिल्डरी’ वृत्ती जिल्हाधिकारी श्री.सिंगला यांनी संघर्ष नगरातील अतिक्रमण धारकांच्या बाबत घेतलेल्या निर्दयी भुमीकेवरुन स्पष्ट झालेले आहे.गडचिरोली येथील लांझेडा लगतचे पंधरा वर्षांपूर्वीचे अतिक्रमित घरे हटविण्याच्या कारवाई बाबत अन्यायग्रस्तांनी,त्यांना पर्यायी जागा व घरे यांची व्यवस्था होताच अतिक्रमण खाली करु, त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्र्यांशी चर्चा होईपर्यंत कारवाई थांबविण्याची विनंती केल्यानंतर आणि याबाबत मा.पालकमंत्र्यांनी मौखिक कल्पना दिल्यानंतरही जिल्हाधिकारी श्री.दिपक सिंगला याप्रकरणी चर्चा आणि सामंजस्याची भुमिकातून प्रकरण न हाताळता उलट एकाच अतिक्रमण धारकांला महसूल आणि वनविभाग अशा दोन्ही विभागांचे नोटीस बजावून मानसिक ताण दिलेला आहे.एकच जागा दोन विभागांच्या मालकीची कशी? हा प्रश्र्न मार्गी न लावताच महसूलाच्या जागेतील अतिक्रमण धारकांना एकतर्फी वनविभागाला हाताशी धरून श्री.सिंगला यांनी मोठ्या फौजफाट्याचा धाक दाखवून, आणि कोणत्याही विनंती पत्र, निवेदन,लिगल नोटीस यांची दखल न घेता एखाद्या खाजगी बिल्डर प्रमाणे कारभार करुन सामान्य नागरिकांना धाक दाखविण्याचा प्रकारही नुकताच केलेला आहे.एट्टापल्ली, भामरागड, धानोरा, कोरची तालुक्यातील आदिवासी नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबतही ते सजग नाहीत, हेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या लक्षात आणून देण्यात आले आहे.

एकंदरीत जिल्हाधिकारी श्री.दिपक सिंगला हे गडचिरोली सारख्या अतिमागास जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी-कामगार आणि सामान्य आदिवासींच्या हिताच्या रक्षणाची बाजू घेऊन काम करणारे नसून रा.स्व.संघाचा कार्यकर्ता असल्यासारखे आणि तस्करीस पोषक, आर्थिक उलाढाल होणारी प्रकरणे हाताळण्यास कुशल असल्याचे दिसून येत असून जिल्हाधिकारी श्री.दिपक सिंगला यांची गडचिरोली येथील जिल्हाधिकारी पदावरून तात्काळ उचलबांगडी करुन जिल्ह्याला सर्वसमावेशक भूमिका आणि कर्तव्य पार पाडून जिल्हा विकासाला हातभार लावणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी विनंतीही शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, शेकाप युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Comments are closed.