Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची अंतिम प्रभाग रचना जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्त्वाच्या निवडणुकीसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका २०२५ साठीची अंतिम प्रभाग रचना शासनाने जाहीर केली असून, जिल्ह्यात आता निवडणुकीचे नगारे वाजण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यातील ५१ जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि १०२ पंचायत समिती निर्वाचक गणांची प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे. २२ ऑगस्टपर्यंत ही रचना प्रसिद्ध करण्याची अंतिम मुदत होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रभाग रचना अंतिम करून ती जाहीर केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रभाग रचनेची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, सर्व तहसीलदार कार्यालये तसेच पंचायत समित्यांच्या कार्यालयांतील सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिवाय जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरही ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष तसेच नागरिक आता आपल्या भागातील प्रभागाचे स्वरूप व आरक्षणाची स्थिती पाहू शकतील.

उपजिल्हाधिकारी (सामान्य) प्रसेनजीत प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकांचे सर्व टप्पे पारदर्शकपणे राबविण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील लोकशाही प्रक्रियेला बळकटी देण्यासाठी ही प्रभाग रचना महत्त्वाची ठरणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान, अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी आपापल्या स्तरावर रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांत उमेदवारांच्या दावेदार्‍यांबरोबरच राजकीय समीकरणांमध्येही हालचाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उत्सुकतेचे केंद्रबिंदू ठरणार हे आता स्पष्ट झाले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.