Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अंतराळ संशोधन क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा लाभ मच्छिमारांना होणार -डॉ. अतुल पाटणे

इस्त्रो, मत्स्यव्यवसाय विभाग आणि केंद्रीय संस्थांच्या वतीने राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई – अंतराळ संशोधन क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा लाभ मासेमारी करताना मच्छिमारांना होणार आहे. समुद्रात मासेमारीसाठी जाताना हवामान. समुद्राची खोली, वाऱ्याचा वेग, मासेमारीसाठी अनुकूल भाग, मच्छिमारांना संकटाच्या वेळी सूचना आदी बाबींची माहिती त्यांना मिळणार आहे. त्यासाठी राज्यात कार्यरत मासेमारी नौकांवर 11 हजार 960 ट्रान्सपॉन्डर्स बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी दिली.

राष्ट्रीय अंतरिक्ष दिवसाच्या अनुषंगाने या दिवसाचे महत्व अधोरेखीत करण्यासाठी ससून गोदी फिशिंग हार्बर मुंबई येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. पाटणे बोलत होते. इस्त्रोचे शास्त्रज्ञ तथा संचालक (इंजि.) धरमविर सिंह, फिशरीज सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबईचे महानिदेशक डॉ. महेशकुमार फरेजिया, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पंकज कुमार, इस्त्रो- स्पेस ॲप्लीकेशन सेंटरचे शास्त्रज्ञ अमित सिन्हा, मत्स्यव्यवसाय विभागाचे सह आयुक्त महेश देवरे आणि  युवराज चौगुले यांच्यासह अशोक कदम आणि मान्यवरांची उपस्थिती होती. केंद्र शासनाच्या मत्स्यपालन, पशुपालन व दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या निर्देशानुसार, देशातील सागरी राज्यांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजन करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

डॉ. पाटणे म्हणाले की, भारताच्या अंतराळ क्षेत्रातील चंद्रयान-3 च्या यशस्वी प्रवासाला सलाम करण्यासाठी दि.23 ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आपल्या धाडस, मेहनत आणि नाविन्याच्या जोरावर अंतराळ संशोधन क्षेत्रात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. “मंगलयान” यासारख्या महत्त्वाच्या यशस्वी मिशन्समुळे भारताने संपूर्ण जगाला आपल्या अपार क्षमतेचे दर्शन घडले. यावेळी त्यांनी मच्छिमारांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन विविध माध्यमातून प्रयत्न करत त्यांनी सांगितले.

भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या इतिहासातील हा विशेष दिवस साजरा करण्यासाठी, अंतराळ विभाग ऑगस्ट, 2024 मध्ये देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. देशातील तरुणांना अंतराळ विज्ञान आणि त्याच्या अनुप्रयोगांबद्दल प्रेरणा मिळावी, ही यामागील कल्पना आहे. यावर्षीचा विषय “चंद्राला स्पर्श करताना जीवनाला स्पर्श करणे” हा आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राज्यात कार्यरत मासेमारी नौकांवर 11,960 मंजूर ट्रान्सपॉन्डर्स बसविण्यात येणार आहेत, त्यांचे प्रात्यक्षिक न्यू स्पेस इंडिया लि. (एनसील)चे प्रतिनिधी प्रेमनाथ पांडे यांनी दाखविले. ट्रान्सपॉन्डर्सच्या सहाय्याने मच्छिमारांच्या जीविताबाबत आवश्यक उपाययोजना करणे, हवामान विषयक माहिती देणे, सुनामी, आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषा इशारा, संभाव्य मासेमारी क्षेत्राबाबतची माहिती (PFZ), जिओ-फेन्स उल्लंघन व नियंत्रण, हाय-टाईड, नेविगेशनल माहिती, मासेमारी सफरीची माहिती तसेच सुरुवात व अंतिम वेळ, खलाश्यांची माहिती घोषित करणे, नौका समुद्रात बंद पडल्यास त्या जागेची माहिती जेणेकरुन आवश्यक उपाय योजना करणे शक्य होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सागरी क्षेत्रातील अवैध मासेमारीवर आळा घालणे व महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 (सु-2021)ची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेकरीता ड्रोनद्वारे देखरेख करण्याच्या दृष्टीने ड्रोन प्रात्यक्षिकांचे आयोजन राष्ट्रीय अंतराळ दिन या दिवशी घेण्यात आले.

यावेळी 200 मच्छिमार सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, केंद्रीय मत्स्यिकी शिक्षण संस्थेतील पीएचडीधारक विद्यार्थी, इस्त्रोचे शास्त्रज्ञ, त्यांचे सहकारी, फिशरीज सर्व्हे ऑफ इंडियाचे अधिकारी व कर्मचारी, ऑटोमोटिव रिसर्च असोसिएशनच ऑफ इंडिया, भारत पेट्रोलीयम लिमिटेडचे प्रतिनिधी यांचीही यावेळी उपस्थिती होती.

थकवा घालवण्यासाठी उपाय

Comments are closed.