Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एकाच कुटुंबातील ५ जणांचा कोरोनाने मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नाशिक डेस्क 16 एप्रिल:- गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. गावोगावी संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित असल्याचे आढळत आहे. अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. अशीच एक घटना नाशिकच्या राजापूरमध्ये घडली. येवला तालुक्यातील राजापूर येथे मन सुन्न करणारी घटना घडली आहे. कोरोनामुळे एका कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका आठवड्यातच कोरोनामुळे हे संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे राजापूर गावात भीतीसह शोककळा पसरली आहे.

आई (वय ७५ वर्षे), मुलगा (५८ वर्षे), नातू (३५ वर्षे), पहिली बहिण (६० वर्षे) आणि दुसरी बहिण (५९ वर्षे) यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना बधितांचा आकडा वाढत असून मृतांची संख्या देखील वाढत आहे. येवला तालुक्यातील राजापूर येथील एक महिला आजारी असल्याने त्यांच्या दोन मुली मुंबईहुन आईला भेटण्यासाठी राजापूर येथे आले होत्या. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यादेखील आजारी पडल्या. त्यामुळे उपचारासाठी त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. त्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येकजण आजारी पडला. एका आठवड्यात या कुटुंबातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. जाधव कुटुंबातील पाच सदस्य जग सोडून गेल्याने त्यांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पाच वर्षांपूर्वी याच कुटुंबातील महिलेचे निधन झाले होते. त्या दुःखातून जाधव कुटुंब सावरत नाही तोच पुन्हा पाच जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी अंत झाला. घरातील कर्त्या पुरूषांचा मृत्यू झाल्याने मागे असलेल्या पत्नी, मुले आणि दिव्यांग भावाची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उभा राहिला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून, नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत 37 हजार 753 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 2 लाख 43 हजार 801 बाधित रुग्णांपैकी 2 लाख 3 हजार 267 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर कोरोनामुळे 2 हजार 781 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.