Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चारचाकी वाहनासह साडेसहाला लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

अहेरी पोलिसांची धडक कारवाई...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी (जि. गडचिरोली), ३ नोव्हेंबर : महाराष्ट्र शासनाने विक्रीस बंदी घातलेली ‘मजा 108’ सुगंधित तंबाखू विक्रीसाठी नेत असलेल्या दोन संशयितांविरुद्ध अहेरी पोलिसांनी सोमवारी पहाटे कारवाई करत तब्बल ६ लाख १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईनंतर गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या अवैध तंबाखू विक्रीविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज पावले उचलल्याची चर्चा आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक ज्ञानेश्वर निलावार (पोना क्र. ३१६७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शंकर म. यालु भिमराजुलवार (३६, रा. सावरकर चौक, आलापल्ली) आणि प्रितम राजेश पेटेवार (३०), रा. श्रमिक नगर, आलापल्ली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी आलापल्ली येथून भामरागड रोडवरून अवैधरित्या सुगंधित तंबाखू विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी सापळा रचून वाहनासह त्यांना पकडले. तपासादरम्यान ‘मजा १०८’ हुक्का तंबाखूचे तब्बल २८० डबे (एकूण किंमत ₹३,१६,४००) आणि एमएच-३३ ए ४३०१ क्रमांकाची मारुती सेलेरियो कार (₹३ लाख) असा मिळून ₹६,१६,४०० चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दिपाली कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार शारदा अर्का आणि त्यांच्या पथकाने केली. तर संपूर्ण कारवाईवर प्रभारी अधिकारी सपोनि मंगेश वळवी यांचे मार्गदर्शन लाभले. गुन्हा कलम १२३, २७४, २७६, २७७, ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये नोंदविण्यात आला आहे.

या कारवाईनंतर पोलिसांनी बंदी घातलेल्या सुगंधित तंबाखू विक्रेत्यांविरुद्ध आणखी कडक मोहीम राबवण्याचे संकेत दिले आहेत. ग्रामीण भागात गुटखा, हुक्का तंबाखू यांचे गुप्त जाळे पुन्हा डोके वर काढत असल्याने आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनालाही आता सतर्क व्हावे लागणार आहे.

अहेरी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध तंबाखू व्यापाराला मोठा धक्का बसला असून, नागरिकांनी अशा गैरकृत्यांविषयी माहिती मिळताच पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी अधिकारी वळवी यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.