Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून वर्षभरात 12 हजार रुग्णांवर मोफत उपचार

उपचारापोटी राज्य सरकारकडून 26 कोटी 61 लक्ष रुपयांचा लाभ

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपूर, 21 जून – आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात गत वर्षभरात एकूण 12059 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. या रुग्णांच्या उपचारापोटी राज्य शासनाकडून 26 कोटी 61 लक्ष 78 हजार 840 रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना राज्यात एकत्रितपणे 23 सप्टेंबर 2018 पासून राबविण्यात येत आहे. या आरोग्य विमा योजनेच्या माध्यमातून प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लक्ष रुपयांपर्यंत मोफत उपचार करण्यात येतात. 1209 प्रकारच्या सर्जिकल व मेडीकल उपचाराच्या माध्यमातून शासकीय व मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयामार्फत रुग्णांना मोफत सेवा देण्यात येत आहे. या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात जुलै 2022 ते 10 जून 2023 पर्यंत एकूण 12059 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आला असून राज्य शासनाकडून 26 कोटी 61 लक्ष 78 हजार 840 रुपये उपचारावर खर्च करण्यात आले आहे.
वर्षभरात उपचार घेतलेल्या 12059 रुग्णांपैकी प्रामुख्याने मेडीकल ऑनकॉलॉजीचे 3902 रुग्ण, पॉली ट्रॉमाचे 1051 रुग्ण, ॲपथॅलमोलॉजी सर्जरी 899, जनरल सर्जरी 829, नेफ्रोलॉजी 791, कार्डीओलॉजी 747, रेडीएशन ॲनकोलॉजी 691 आणि सर्जिकल ॲनकोलॉजीचे 504 रुग्णांचा समावेश आहे. तसेच याव्यतिरिक्त जळालेले रुग्ण, क्रिटीकल केअर, डरमॅटोलॉजी, ईएनटी सर्जरी, एंडोक्रिनॉलॉजी, हिमॅटोलॉजी, न्युरोलॉजी, पेडीॲट्रीक कॅन्सर, पेडीॲट्रीक सर्जरी, प्लॉस्टिक सर्जरी, सर्जीकल गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी आदी रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात समाविष्ठ असलेली रुग्णालये : आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यात शासकीय व खाजगी अशी एकूण 10 रुग्णालये समाविष्ठ आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय / जिल्हा सामान्य रुग्णालय, बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय, चिमूर उपजिल्हा रुग्णालय, वरोरा उपजिल्हा रुग्णालय आणि मूल येथील उपजिल्हा रुग्णालय तर खाजगी रुग्णालयांमध्ये वासाडे रुग्णालय, गाडेगोणे रुग्णालय, मानवतकर रुग्णालय, मुसळे रुग्णालय आणि ख्रिस्त रुग्णालयाचा समावेश आहे.

जिल्ह्यात 3 लक्ष 47 हजार नागरिकांना गोल्डन ई – कार्डचे वाटप : आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना 2011 मधील नोंदित कुटुंब या योजनेचे पात्र लाभार्थी आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील 2 लक्ष 19 हजार 417 व शहरी विभागातील 55383 असे एकूण 2 लक्ष 74 हजार 800 कुटुंबाचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण लाभार्थी संख्या 9 लक्ष 93 हजार 232 असून आतापर्यंत 3 लक्ष 47 हजार 987 नागरिकांना (गोल्डन ई – कार्ड) आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत लाभ घेण्याकरीता पात्र लाभार्थीजवळ सदर कार्ड असणे आवश्यक असल्यामुळे पात्र लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिला कार्ड वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.