Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बंदुकीच्या सावलीतून स्वावलंबनाकडे…

३७ बटालियनच्या नागरी कृतीतून भामरागड–अहेरीत ५० महिलांच्या हातात कौशल्याची चावी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड व अहेरी परिसरात विकासाचा अर्थ केवळ रस्ते वा इमारती एवढाच न राहता, तो थेट घराघरात पोहोचायला हवा, ही जाणीव ठेवत ३७ बटालियनच्या नागरी कृती कार्यक्रमांतर्गत महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा ठोस प्रयत्न करण्यात आला आहे. उन्नती फाउंडेशन, अहेरी यांच्या सहकार्याने ग्रामीण व स्थानिक भागातील महिलांसाठी स्वयंरोजगाराभिमुख प्रशिक्षण उपक्रमांची सुरुवात करण्यात आली असून, याअंतर्गत एकूण ५० महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे.

ए/३७ लाहेरी येथे जवळच्या गावांतील २० महिलांसाठी ब्युटी पार्लर कोर्सचे एक महिन्याचे प्रशिक्षण दि. ३० डिसेंबर २०२५ ते २९ जानेवारी २०२६ या कालावधीत सुरू करण्यात आले आहे. तर सी/३७ भामरागड येथे ३० महिलांसाठी टेलरिंग प्रशिक्षणाचा उद्घाटन समारंभ मंगळवारी (दि. ३०) उत्साहात पार पडला. या दोन्ही अभ्यासक्रमांचा मुख्य उद्देश ग्रामीण महिलांना कौशल्याची संधी देत त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रशिक्षण कार्यक्रमांचे उद्घाटन ३७ बटालियनचे कार्यवाहक कमांडंट सुजित कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, भामरागड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन शेवाळे, श्रीमती सरिता कोंडुलवार तसेच उन्नती फाउंडेशन, नागपूरचे अध्यक्ष डॉ. विजय घुमरे आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी महिलांना संबोधित करताना कार्यवाहक कमांडंट सुजित कुमार म्हणाले, “आजच्या स्पर्धात्मक युगात महिलांसाठी ब्युटी पार्लर आणि टेलरिंगसारखे अभ्यासक्रम केवळ कौशल्य देत नाहीत, तर आत्मविश्वास, आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक सन्मान मिळवून देतात. अशा उपक्रमांमुळे महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात आणि कुटुंबाचे अर्थकारणही भक्कम होते.”

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या प्रशिक्षणादरम्यान महिलांना मूलभूत तसेच प्रत्यक्ष उपयोगी कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील, अशी रचना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दुर्गम भागातील महिलांपर्यंत थेट पोहोचून अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जात असल्याने, या उपक्रमाकडे केवळ रोजगारनिर्मिती म्हणून नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचे साधन म्हणून पाहिले जात आहे.

या उपक्रमामुळे परिसरातील महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, प्रशिक्षणार्थी महिलांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांमध्येही सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. पालक आणि स्थानिक नागरिकांनी ३७ बटालियनच्या नागरी कृती कार्यक्रमाचे कौतुक करत, महिलांच्या स्वावलंबनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे आणि दूरगामी परिणाम घडवणारे पाऊल असल्याचे मत व्यक्त केले.

बंदुकीच्या सावलीतून ओळखल्या जाणाऱ्या या भागात कौशल्य, आत्मविश्वास आणि रोजगाराच्या संधींची बीजे रोवण्याचा हा प्रयत्न भविष्यात अनेक महिलांचे आयुष्य बदलणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.