Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीला ‘हरित पोलाद’ची ओळख!

कोनसरीत महाराष्ट्राच्या औद्योगिक पुनर्जन्माची पायाभरणी: गडचिरोलीतून देशाला पोलादाचा नवा आत्मा देणार!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली (कोनसरी): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे २२ जुलै २०२५ रोजी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल)च्या ४.५ एमटीपीए क्षमतेच्या मेगा इंटिग्रेटेड स्टील प्लांटची पायाभरणी झाली. हा प्रकल्प केवळ औद्योगिकीकरणाचं नव्हे, तर गडचिरोलीच्या सामाजिक-आर्थिक पुनरुत्थानाचं दृश्य घोषणापत्र आहे, असं ठामपणे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, “पुढील पाच वर्षांत गडचिरोली राज्याच्या टॉप-१० जिल्ह्यांमध्ये असेल.” जिल्ह्याच्या औद्योगिक भविष्यासाठी निर्णायक ठरणाऱ्या या समारंभात एलएमईएलच्या पेलेट प्लांटचे उद्घाटन, ८५ किमी स्लरी पाइपलाइनचा प्रारंभ, हेडरीमधील ग्राइंडिंग युनिटचा शुभारंभ, तसेच सोमनपल्ली येथे कर्मचाऱ्यांची वसाहत, सीबीएसई मान्यताप्राप्त शाळा आणि १०० खाटांचे रुग्णालय या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थित असलेले लोकप्रतिनिधी, अधिकारी, पोलीस, विद्यार्थी आणि हजारो नागरिक हे या परिवर्तनाचे थेट साक्षीदार ठरले.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की जिल्ह्यातील लोहखनिजाचे समृद्ध भांडार, ग्रीन स्टील निर्मितीतील तंत्रज्ञान, महिलांचे प्रशिक्षण, आत्मसमर्पित माजी माओवादींचे पुनर्वसन आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगार व शिक्षणाच्या संधी यांच्या समन्वयातून गडचिरोली भारताच्या औद्योगिक नकाशावर एक मजबूत केंद्र बनणार आहे. “गडचिरोलीतून पोलाद तयार होईल, चीनशी आपण गुणवत्ता आणि किंमतीत स्पर्धा करू,” असे सांगताना त्यांनी एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या दूरदृष्टीचे विशेष कौतुक केले. त्यांनी महिलांना ‘पोलादी महिला’ म्हणून गौरवले, कारण या भागातील महिलांना घरकामातून प्रशिक्षित करत हलकी वाहने आणि आता ‘व्होल्वो पेलेट ट्रक’ चालवण्याच्या स्तरापर्यंत नेल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात थेट १२ ते ५५,००० रुपयांची झेप मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. हे केवळ आर्थिक नाही, तर सामाजिक सक्षमीकरणाचे स्पष्ट उदाहरण आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुख्यमंत्री म्हणाले की, पर्यावरण आणि विकास यात समन्वय साधत औद्योगिक विकास करणे आवश्यक असून स्लरी पाइपलाइन, इलेक्ट्रिक ट्रक ताफा आणि ग्रीन स्टील निर्मितीच्या माध्यमातून हा प्रकल्प कार्बन उत्सर्जनही घटवेल. या प्रसंगी त्यांनी ४० लाख झाडांच्या वृक्षारोपण मोहिमेचे उद्घाटन करत ‘दोन वर्षांत एक कोटी वृक्ष लागवड’ या सरकारच्या संकल्पाची आठवण करून दिली. राजामुंद्रीच्या धर्तीवर एलएमईएलने गडचिरोलीत उभारलेल्या रोपवाटिकेचे त्यांनी कौतुक केले. त्यांनी गोंडवाना विद्यापीठात कर्टिन विद्यापीठाच्या सहकार्याने उभारलेल्या ‘युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चा विशेष उल्लेख केला, ज्यामुळे गडचिरोलीतून भविष्यातील उत्कृष्ट खाण अभियंते घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात एलएमईएलमध्ये नियुक्त झालेल्या १,४०० पैकी चार तरुणांना नियुक्तीपत्र, कर्टिन विद्यापीठात पाठवलेल्या सहा विद्यार्थ्यांना बोर्डिंग पास आणि युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूटमधील पाच विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र प्रदान करून मुख्यमंत्री यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. शिवाय, ६०० कामगारांपैकी पाच कामगारांना ESOP अंतर्गत समभाग प्रदान करत कामगारांना ‘भागधारक’ बनवण्याच्या एलएमईएलच्या उपक्रमाला त्यांनी विशेष मान्यता दिली. लॉयड्स अँथमचे उद्घाटन करत ‘ही केवळ कंपनी नाही, तर एका नवभारताच्या निर्मितीचा सूर आहे’, अशी भावना कार्यक्रमात उमटली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बी. प्रभाकरन यांनी मराठीतून दिलेल्या भाषणात उपस्थितांशी आत्मीयतेने संवाद साधला. “गडचिरोलीच्या लोकांसोबत मिळून आम्ही यशोगाथा लिहिली आहे. जमशेदपूरचा प्रकल्प १ एमटीपीएने सुरू झाला, पण कोनसरीचा प्रकल्प ४.५ एमटीपीएने सुरू होतोय. आपण याला दुय्यम पोलाद प्रकल्पांनी समर्थन दिलं, तर गडचिरोली देशातील स्टील हब बनेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी आतापर्यंत १०,६०० कर्मचाऱ्यांना कंपनीचे समभाग देण्यात आले असून, आणखी हजारो लोकांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून दिला जात आहे, हे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सहपालकमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी गडचिरोलीच्या प्रगतीबाबत मुख्यमंत्री कधीही ‘नकार’ देत नाहीत, असे स्पष्ट करत काही जण लोकांमध्ये गोंधळ निर्माण करत असले तरी जिल्ह्यातील जनतेने विकासाची दिशा स्वीकारली असल्याचे सांगितले. जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि उद्योग यांच्यातील समन्वयामुळे हा प्रकल्प केवळ उद्योगाची घोषणा राहिलेला नाही, तर गडचिरोलीच्या पुनरुत्थानाचे नवे पर्व ठरत आहे.

Comments are closed.