Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली नगर परिषदेत सत्तेचा अंकगणित जिंकले; पण भाजपमध्ये अस्वस्थता उफाळली

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक निखिल चरडे यांची अविरोध निवड झाली असली, तरी या निवडीमुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणात असंतोषाची ठिणगी उडाल्याचे स्पष्ट चित्र आज समोर आले.

नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत उपाध्यक्षपदाची निवड आणि स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. उपाध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज असल्याने निखिल चरडे यांची निवड औपचारिक ठरली. त्याचवेळी भाजपतर्फे सागर निंबोरकर आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधाकर येनगंधलवार, तर काँग्रेसकडून नंदू कायरकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मात्र या निर्णयांमुळे भाजपमधील अनुभवी नगरसेवकांचा डावललेपणा ठळकपणे पुढे आला. माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, नगरसेवक अनिल कुनघाडकर आणि मुक्तेश्वर काटवे यांना उपाध्यक्षपदासाठी संधी दिली जाईल, अशी अपेक्षा पक्षात होती. विशेषतः कुनघाडकर यांची आधीच गटनेतेपदी वर्णी लावून उपाध्यक्षपदाच्या शर्यतीतून त्यांना दूर ठेवण्यात आले, तर योगिता पिपरे यांचे नाव चर्चेत असतानाही अखेर पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्या निखिल चरडे यांना पद देण्यात आल्याने पक्षांतर्गत नाराजी उघडपणे व्यक्त झाली.

या अस्वस्थतेचे प्रतिबिंब सभागृहातही दिसून आले. निवड प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच योगिता पिपरे सभागृहातून बाहेर पडल्या, तर काही वेळाने मुक्तेश्वर काटवे यांनीही सभास्थळ सोडले. विशेष म्हणजे अभिनंदन सोहळ्याला आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि माजी खासदार अशोक नेते यांची अनुपस्थितीही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान, भाजपचे प्रदेश सचिव रमेश भुरसे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या जिल्हा नेतृत्वावर थेट आरोपांचा भडिमार केला. स्वीकृत सदस्य निवडीत आपल्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोप करत, चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्याकडील जिल्हा प्रभारीपद काढून घ्यावे आणि जिल्हा महासचिव गोविंद सारडा यांची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली.

भुरसे यांनी निवडणूक प्रक्रियेत दिलेल्या शब्दभंगाचा मुद्दा उपस्थित करत, जिल्ह्यातील पराभवांची जबाबदारीही थेट नेतृत्वावर टाकली. २०१६ मध्ये २१ नगरसेवक असलेला भाजप यंदा १५ वर का घसरला, याचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी काहीजण स्वतःला ‘विजयाचे शिल्पकार’ म्हणून मिरवत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

या भूमिकेला भाजपचे ज्येष्ठ नेते गजानन येनगंधलवार यांनीही दुजोरा दिला. चार दशकांची पक्षनिष्ठा, आंदोलनांतील सहभाग आणि अंगावर घेतलेल्या खटल्यांचा उल्लेख करत, स्वीकृत सदस्यपदासाठी आपल्या नावाचा विचार न झाल्याची तीव्र खंत त्यांनी व्यक्त केली. ही उपेक्षा कायम राहिल्यास पक्षत्यागाचा पर्याय खुला आहे, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.