Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस दलामार्फत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामूहिक योग शिबिरांचे आयोजन

जिल्हाभरात ३ हजारांहून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सहभाग; SP नीलोत्पल यांचे आरोग्याबाबत आवाहन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, २१ जून : धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत शरीरासोबतच मनही सशक्त राखण्यासाठी योग हा प्रभावी पर्याय आहे. योगसाधनेच्या महत्त्वाकडे लक्ष वेधत गडचिरोली पोलीस दलाने आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हाभरात सामूहिक योग शिबिरांचे आयोजन केले. पोलीस मुख्यालय गडचिरोली, पोलीस उपमुख्यालय प्राणहिता, तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, पोलीस ठाणी, उपठाणी आणि पोमकें येथे हे उपक्रम यशस्वीरित्या पार पडले.

एकूण ३ हजारांहून अधिक पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी सकाळी ६.३० वाजता एकाच वेळी सामूहिक योगाभ्यासात सहभाग घेत सकारात्मक आरोग्यदृष्टीचा संदेश दिला. पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील प्रमुख शिबिरात जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश (अभियान), अपर पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक (प्रशासन), पोलीस उपअधीक्षक विशाल नागरगोजे, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या शिबिरात योग प्रशिक्षक संतोष भाऊराव वेखंडे यांनी उपस्थितांना विविध योगासनांचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन दिले. ‘शरीर आणि मन सशक्त ठेवण्यासाठी नियमित योग अत्यावश्यक असून, प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने किमान २० मिनिटे दररोज योगासने करावीत’ असे आवाहन यावेळी SP नीलोत्पल यांनी केले.

पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथील उपक्रमातही सुमारे ५०० पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी सहभाग नोंदवला. योग सत्रात श्वसन नियंत्रक प्राणायाम, ध्यानधारणा, सूर्यनमस्कार आणि ताणतणाव कमी करणाऱ्या आसनांवर भर देण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रा.पो.नि. अनुजकुमार मडामे, पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी नरेंद्र पिवाल तसेच विविध ठाणी, उपठाणी, पोमकेंचे अधिकारी व अंमलदार यांनी विशेष मेहनत घेतली.

गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आरोग्यस्नेही संस्कृती रुजवण्यासाठी पोलीस दलाचा हा उपक्रम मार्गदर्शक ठरेल, अशी भावना सहभागी पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

 

 

Comments are closed.