गडचिरोली पोलिसांकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक सहलीचं आयोजन; शिस्त, शौर्य आणि संवेदनशीलतेचा अनोखा अनुभव
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना आधुनिक शस्त्रसज्जतेपासून ते आत्मविश्वासापर्यंत बहुआयामी शिकवण....
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली | २९ जुलै : संवेदनशीलतेची नवी व्याख्या रेखाटत, गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने आज दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक सहलीचं आयोजन करत समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत आपली बांधिलकी अधोरेखित केली.
पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे आयोजित या उपक्रमात रहिवासी अपंग विद्यालय, लांजेडा; निवासी मुक व बधीर विद्यालय, गडचिरोली; आणि कौसल्या निवासी मतीमंद विद्यालय, बोदली येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या मुलांना पोलीस मुख्यालय, शस्त्रागार, विशेष अभियान पथक, आणि आयुधिक कार्यशाळेची माहिती देत पोलीस दलातील कार्यशैली, शिस्तबद्धता आणि तांत्रिक क्षमतांचं जिवंत दर्शन घडवण्यात आलं.
विद्यार्थ्यांना केवळ पोलिसांच्या कामकाजाची माहिती देऊन थांबण्यात न येता त्यांना विविध शस्त्रांची प्रत्यक्ष हाताळणी करण्याची संधीही देण्यात आली. हे क्षण त्यांच्या स्मरणात दीर्घकाळ रेखाटले जाणार, याबाबत शिक्षक आणि समुपदेशकांनी समाधान व्यक्त केलं.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्कूलबॅग, कम्पास, एलसीडी पॅनल बोर्ड, शैक्षणिक तक्ते, क्रिकेट साहित्य, फुटबॉल, रुबीक्स क्यूब, लगोरी इत्यादी शैक्षणिक व खेळाच्या साहित्यांचं वाटप पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नीलोत्पल म्हणाले, “परिस्थिती कितीही कठीण असली, तरी आत्मविश्वास हेच यशाचं खरं शस्त्र आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगासारख्या परीक्षांमध्ये देखील दिव्यांग विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे; तुम्हीही तेच करू शकता, फक्त ध्येय मोठं ठेवा आणि प्रयत्न सातत्याने करत राहा.”
या उपक्रमाला पोलीस प्रशासनाचा सर्वतोपरी पाठिंबा लाभला. कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुलराज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्यासह संबंधित विद्यालयांचे मुख्याध्यापक व मानसशास्त्रज्ञ शशिकांत शंकरपुरे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रापोनि. अनुजकुमार मडामे, पोउपनि. नरेंद्र पिवाल, पोउपनि. संतोष कोळी आणि पोलीस मुख्यालय व पोलीस कल्याण शाखेचे कर्मचारी यांनी अतुलनीय मेहनत घेतली.
Comments are closed.