Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने वाचले गरोदर मातेचे प्राण

पोलीस दलाच्या हेलीकॉप्टरच्या सहाय्याने दुर्मिळ बी-निगेटिव्ह रक्तगटाची पिशवी तात्काळ पोहचविण्यात आल्याने मातेला मिळाले नवे जीवन.

0

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क 

 भामरागड : तीन दिवसांपासून जिल्ह्रात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्रातील अतिदुर्गम अशा भामरागड तालुक्याचा व तालुक्यातील इतर गावांचा संपर्क तुटलेला आहे. अशातच दिनांक 08 सप्टेंबर 2024 रोजी एका महिलेची ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे प्रसुती झाली होती. प्रसुती दरम्यान खुप रक्तस्त्राव झाल्यामुळे मातेला रक्ताची गरज भासली. परंतु पुरामुळे ग्रामीण रुग्णालय भामरागड इथपर्यंत रक्ताचा पुरवठा करणे शक्य होत नाही,  जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली डॉ. माधुरी विके (किलनाके) यांनी हेलीकॉप्टरच्या सहाय्याने रक्तपुरवठा करणे शक्य आहे किंवा नाही याबाबत पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचेशी चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी, गडचिरोली व जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली यांचेशी समन्वय साधुन आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाच्या हेलीकॉप्टरच्या सहाय्याने विनाविलंब गडचिरोली येथील जिल्हा सामाण्य रुग्णालयात उपलब्ध असलेल्या बी-निगेटिव्ह अशा दुर्मिळ रक्तगटाची एक पिशवी अहेरी येथुन ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे पाठविण्यात आली.

अधिक माहिती अशी की, सौ. मानतोश्री गजेंद्र चौधरी, वय 24 वर्षे, रा. आरेवाडा तह. भामरागड जि. गडचिरोली असे महिलेचे नाव असुन दिनांक 08 सप्टेंबर 2024 रोजी प्रसववेदला जाणवू लागल्याने तिस ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे दाखल करण्यात आले होते. तिची दिनांक 09 सप्टेंबर 2024 रोजी सुरक्षित प्रसुती झाली व तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. परंतू, प्रसुतीदरम्यान रक्तस्त्राव अधिक झाल्याने तिची प्रकृती खालावली होती. त्यामुळे तिला तात्काळ रक्त चढविणे आवश्यक होते. ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे उपलब्ध असलेली बी-निगेटिव्ह रक्ताची एक पिशवी मानतोश्रीला चढविण्यात आलेली होती. परंतू, तिच्या प्रकृतीत पुर्णपणे सुधारणा होण्यासाठी आणखी एका पिशवीची आवश्यकता होती. अशावेळी बाहेर सर्वत्र पुरपरिस्थिती निर्माण झालेली असतांना तसेच खराब हवामानामुळे हेलीकॉप्टरने रक्तपिशवी ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे पोहचविणे कठीण झाले होते. अखेर आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी पावसाने विश्रांती घेताच पोलीस दलाच्या हेलीकॉप्टरने तात्काळ रक्तपिशवी भामरागड येथे पोहचविण्यात आली. सध्या माता मानतोश्री व बाळाची प्रकृती स्थिर असून माता व बाळ दोघेही सुरक्षित आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Leave A Reply

Your email address will not be published.