Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीच्या आलापल्ली आयटीआयचा राज्यात डंका; उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‘उत्कृष्ट संस्था’चा बहुमान

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई/गडचिरोली: दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त ओळखीतून बाहेर पडत गडचिरोली जिल्हा आता कौशल्य विकासाच्या नकाशावर ठळकपणे झळकू लागला आहे. या परिवर्तनाला अधोरेखित करणारा मानाचा तुरा म्हणजे आलापल्ली येथील विश्वेश्वरराव आत्राम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (ITI) राज्यातील आदिवासी क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट संस्था पुरस्कार मिळाल्याची अभिमानास्पद कामगिरी.

राजभवन, मुंबई येथे पार पडलेल्या भव्य समारंभात देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यपाल जिष्णु देव-वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात कार्यरत असलेल्या या संस्थेने केवळ शैक्षणिक गुणवत्तेतच नव्हे, तर रोजगारनिर्मिती आणि सामाजिक बांधिलकीतही उल्लेखनीय ठसा उमटवला आहे. संस्थेच्या माध्यमातून लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड या उद्योगसमूहात तब्बल ७८ प्रशिक्षणार्थ्यांना नियमित रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनेंतर्गत सुमारे ३ कोटी रुपयांची कामे पूर्ण करत शासनाला सुमारे १६ लाख रुपयांचा महसूलही मिळवून देण्यात आला आहे.

यापलीकडे, सामाजिक जबाबदारीची जाणीव जपत संस्थेने NSS अंतर्गत भामरागड तालुक्यातील कोठी आणि पोयरकोठी गावांतील सुमारे २०० पूरग्रस्त घरांचे विद्युतीकरण करून मानवतेचा आदर्श घालून दिला आहे. शिक्षण, कौशल्य आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांत संतुलित कामगिरी केल्यामुळेच या संस्थेला हा प्रतिष्ठेचा सन्मान बहाल करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

संस्थेचे प्राचार्य वैभव बोंगीरवार यांनी हा पुरस्कार स्वीकारताना गडचिरोलीच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा गौरव केला. यावेळी आदिवासी वेशभूषेत उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचा अभिमान आणि आधुनिकतेकडे झेप घेण्याची तयारी यांचे प्रभावी दर्शन घडवले.

एकूणच, आलापल्ली आयटीआयचा हा सन्मान केवळ एका संस्थेचा नसून, गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात उगवणाऱ्या नव्या कौशल्य क्रांतीचा आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणाऱ्या आदिवासी समाजाच्या उन्नतीचा प्रतीक ठरत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.