औद्योगिक क्रांतीकडे गडचिरोलीचा निर्णायक टप्पा: कोनसरीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमासाठी भव्य जलरोधक मंडपाची तयारी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्ह्याच्या औद्योगिक वाटचालीस नवे परिमाण देणाऱ्या लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि. च्या महत्त्वाकांक्षी स्टील प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिनांक २२ जुलै रोजी गडचिरोली दौऱ्यावर येत आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कोनसरी येथील प्रकल्प परिसरात भव्य जलरोधक (वॉटरप्रूफ) मंडपाची उभारणी करण्यात आली असून, कार्यक्रमाच्या नियोजनास अंतिम रूप दिलं जात आहे.
रविवारी या मंडपाची आणि संपूर्ण व्यवस्थेची पाहणी माजी खासदार, भाजपा अनुसूचित जनजाति मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी केली. त्यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आणि नियोजनबद्धतेबद्दल समाधान व्यक्त केले.
चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे सुरू असलेला स्टील प्रकल्प जिल्ह्याच्या औद्योगिक इतिहासातील मैलाचा दगड ठरणार असून, यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, तसेच परिसराचा सामाजिक आणि आर्थिक विकास वेगाने घडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या प्रकल्पासोबतच हेडरी येथील पॅलेट प्लांट आणि ८५ किमी लांबीच्या स्लरी पाईपलाईनचे उद्घाटनही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, हा दौरा त्यांच्या वाढदिवसाच्याच दिवशी होत असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
तयारीच्या पाहणीवेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, अरुण हरडे, तसेच लॉयड्स मेटल्सचे कार्यकारी संचालक एस. व्यंकटेश्वरन, बलराम सोमनानी, वेदांश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
गडचिरोलीसारख्या संवेदनशील, परंतु प्रचंड संभाव्यता असलेल्या जिल्ह्याच्या विकासदृष्टीने या प्रकल्पाचे उद्घाटन केवळ उद्योगप्रवेश नव्हे, तर विश्वासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल, अशी अपेक्षा आहे.
Comments are closed.