गडचिरोलीचा त्रिसूत्री बदल : शस्त्रांपासून संवादापर्यंत, आणि संवादापासून विकासापर्यंतचा प्रवास
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
संपादकीय
ओमप्रकाश चुनारकर
गडचिरोलीच्या दाट जंगलात एकेकाळी दहशतीच्या गोळ्या घुमत असत, पण आज तिथं संवादाच्या घोषणा ऐकू येतात. नक्षलवादाच्या रक्ताळलेल्या पायवाटा आता पुनर्वसनाच्या वाटांनी सजत आहेत. हे दृश्य केवळ शासनाच्या अहवालातलं यश नाही, तर एका जनतेच्या मनोधैर्याचा पुनर्जन्म आहे. गडचिरोली आज भारताच्या नकाशावर शांततेचं आणि नव्या सामाजिक चेतनेचं प्रतीक बनत आहे — आणि या परिवर्तनामागं आहे ‘त्रिसूत्री कार्यक्रम’ : सुरक्षा, संवाद आणि सामाजिक विकास.
पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली पोलीस दलानं एक अनोखा प्रयोग सुरू केला आहे — ‘माणूस जिंकायचा, प्रदेश नाही’ या विचारावर उभा असलेला हा प्रयोग नक्षलवादाच्या इतिहासात मानवी स्पर्श आणतो. या जिल्ह्यानं गेल्या तीन वर्षांत केलेली झेप ही केवळ शस्त्रास्त्रं ठेवणाऱ्यांची नव्हे, तर विचार बदलणाऱ्यांची आहे. बारा वरिष्ठ नक्षलवाद्यांनी नुकतंच आत्मसमर्पण केलं — पण हा आकडा फक्त सांख्यिकी नाही, हा आहे एक विचारक्रांतीचा पुरावा.
या आत्मसमर्पणांच्या मागे केवळ पोलिसांची मोहिम नाही, तर ‘विश्वासाचा संवाद’ आहे. जंगलातील तरुणांना ‘दादांलोरो खिडकी’ या उपक्रमातून थेट आपली बाजू मांडण्याचं व्यासपीठ मिळालं. या दादांलोरो खिडकीतून आलेल्या हजारो तक्रारी, अर्ज, आणि संवादांच्या ओळी — या सर्वांनी एक प्रकारचं “मानवी प्रशासन” घडवलं.
निलोत्पल यांच्या ‘दादांलोरो खिडकी’ उपक्रमानं नक्षल प्रभावित भागात शासनाचा चेहरा मानवी केला. तक्रारदाराला उत्तर मिळालं, आत्मसमर्पणाची संधी मिळाली, आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे — प्रशासनानं प्रथमच ऐकण्याची भाषा आत्मसात केली.
या प्रक्रियेला बळ दिलं ‘त्रिसूत्री कार्यक्रमानं’. पोलिसांनी केवळ सुरक्षा मोहिम राबवली नाही, तर एकाच वेळी समाजाशी संवाद साधला आणि विकासाचा पाया घातला. “जनसंवाद”, “शांतिग्राम”, “ग्राम सभा संपर्क अभियान”, “युवा प्रेरणा मंच”, “पोलीस सार्वजनिक शाळा” अशा अनेक उपक्रमांनी नक्षलवाद्यांच्या प्रभावक्षेत्रात शासनाचं उपस्थिती नवा विश्वास निर्माण करत गेलं.
CSR उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. आत्मसमर्पण करणाऱ्यांना नवीन ओळख, नवी सुरुवात मिळाली — कुणी कृषी व्यवसायात, कुणी महिलांच्या स्वयंसहायता गटांत, तर कुणी पोलिसांच्या नागरी उपक्रमात सामील झाले.
या संपूर्ण परिवर्तनाचा पाया म्हणजे ELMEL मॉडेल — Empathy (संवेदना), Leadership (नेतृत्व), Motivation (प्रेरणा), Engagement (सहभाग) आणि Livelihood (उपजीविका). या मॉडेलनं गडचिरोलीत सुरक्षा आणि विकास यांना जोडणारं सेतू निर्माण केलं. पोलिस अधिकारी, ग्रामसंघटना, उद्योग CSR, आणि नागरिक — हे चार घटक एकत्र आले, आणि गडचिरोलीचा समाज नव्याने घडू लागला.
आज जे आत्मसमर्पण दिसतंय ते केवळ निःशस्त्रीकरण नाही, तर विचारमुक्ती आहे. एकेकाळी शासनविरोधी विचारांचा झेंडा उचलणारे तरुण आता शासनाच्या प्रशिक्षण केंद्रात कौशल्य मिळवतात; गावांमध्ये ‘पोलीस मित्र’ म्हणून काम करतात. हा बदल कुठल्याही बळाने शक्य झाला नाही — तर विश्वास, संवाद आणि मानवतेच्या भावनेनं साधला गेला.
या प्रक्रियेत निलोत्पल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासनाला ‘भावनिक बुद्धिमत्ता’ दिली. त्यांनी शासनाला ‘जनसंवादाचं रूप’ दिलं. या प्रयत्नांनी गडचिरोलीत एक नवं परिमाण निर्माण केलं आहे — जिथं पोलीस शत्रू नाही, तर समाजाचा साथीदार आहे.
आज गडचिरोली केवळ शस्त्रं ठेवणाऱ्या माओवाद्यांचा जिल्हा नाही, तर “संवाद सुरू करणाऱ्या नायकांचा प्रदेश” आहे. या भूमीचा बदल देशासाठी एक आरसा आहे — की जेव्हा शासन लोकांशी बोलतं, तेव्हा विकास आणि शांतता आपोआप येते.
गडचिरोलीचा प्रवास अजून पूर्ण झालेला नाही; पण दिशा निश्चित झाली आहे. आज या जिल्ह्यातून उगवणारा सूर्योदय हा केवळ प्रकाशाचा नाही, तर विश्वासाचा आहे. आणि म्हणूनच —“शस्त्रांचा शेवट म्हणजे शांततेची सुरुवात; आणि गडचिरोली ही सुरुवात बनली आहे.”