राष्ट्रीय कुस्ती रंगभूमीवर गोंडवाना विद्यापीठाची दणदणीत नोंद
हितेश सोनवानेचे झुंजार प्रदर्शन; खेलो इंडिया स्पर्धेत कास्यपदकाची कमाई....
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ३० :
भरतपूरमध्ये सुरू असलेल्या 5व्या खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाचा तडफदार पैलवान हितेश चंद्रभान सोनवाने यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर ग्रीको-रोमन ६० किलो गटात कास्यपदक पटकावून विद्यापीठाचा राष्ट्रीय पातळीवरील झेंडा अभिमानाने उंचावला आहे.
निव्वळ ताकद नव्हे, तर तांत्रिक कसब, चपळ हालचाली आणि अखेरच्या क्षणापर्यंत विजयासाठी लढण्याची वृत्ती— या सर्वांचा अचूक वापर करत हितेशने प्रतिस्पर्ध्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
NIS प्रशिक्षक सुहास बनकर यांनी दिलेल्या कडक प्रशिक्षणाचे प्रतीक म्हणून सोनवाने यांनी रंगलेल्या सामन्यांत झुंजार स्पर्धकांचीही दाणादाण उडवली.
या दमदार यशाने विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रात नवचैतन्याचा शिडकावा झाला असून, ग्रामीण पार्श्वभूमीतूनही जागतिक दर्जाचे खेळाडू घडू शकतात, याची पुन्हा एकदा प्रचिती मिळाली आहे.
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, तसेच शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. अनिता लोखंडे यांनी हितेशचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
विद्यापीठाच्या खेळाडूंकडून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी भरीव कामगिरीची अपेक्षा व विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Comments are closed.