Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठाच्या ‘गोंडवाना मॉडेल’ ग्रंथांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : दुर्गम, वनव्याप्त आणि अनेक वर्षे विकासाच्या काठावर राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून आता शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तनाची ठोस वाट निर्माण होत असल्याचे चित्र समोर आले आहे. गोंडवाना विद्यापीठने राबविलेल्या नाविन्यपूर्ण आणि समाजकेंद्रित उपक्रमांची दखल राज्यपातळीवर घेतली जात असून, ‘गोंडवाना मॉडेल: बेस्ट प्रॅक्टिसेस ऑफ गोंडवाना युनिव्हर्सिटी’ या महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

नागपूर येथील विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी), नागपूरमध्ये आयोजित ‘ज्ञान सभा – विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण’ या राष्ट्रीय संमेलनात पार पडलेला हा सोहळा केवळ पुस्तक प्रकाशनापुरता मर्यादित न राहता, ग्रामीण आणि आदिवासी भागातील शिक्षणाच्या नव्या दृष्टिकोनाला मिळालेली अधिकृत मान्यता ठरला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कार्यक्रमाला अतुल कोठारी, विजयकुमार नारनवरे, डॉ. मनाली क्षीरसागर, डॉ. प्रेम लाल पटेल आणि प्रा. भीमराया मैत्री यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली. विविध क्षेत्रांतील या तज्ज्ञांनी ‘गोंडवाना मॉडेल’कडे ग्रामीण भारतासाठीच्या प्रयोगशील विकासदृष्टीचा आराखडा म्हणून पाहण्याची गरज अधोरेखित केली.

विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने (IQAC) प्रकाशित केलेल्या या ग्रंथांचे संपादन प्रा. धनराज पाटील यांनी केले आहे. एक आकर्षक ‘कॉफी टेबल बुक’ आणि एक सखोल संपादित ग्रंथ अशा दुहेरी स्वरूपात सादर करण्यात आलेल्या या पुस्तकांमध्ये गडचिरोलीच्या सामाजिक वास्तवाशी घट्ट जोडलेल्या १३ ‘बेस्ट प्रॅक्टिसेस’चे सविस्तर दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

‘एकल ग्रामसभा सक्षमीकरण’ उपक्रमातून स्थानिक स्वराज्य व्यवस्थेला बळकटी, ‘युनिव्हर्सिटी अॅट व्हिलेज’मुळे शिक्षण थेट गावांच्या उंबरठ्यावर, तर ‘SPARC’सारख्या उपक्रमातून व्यसनमुक्ती आणि शिक्षणाचा संगम—अशा विविध अंगांनी या मॉडेलने शिक्षणाला सामाजिक जबाबदारीची नवी किनार दिली आहे. हे उपक्रम केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता, लोकजीवनात परिवर्तन घडविण्याचे माध्यम बनले आहेत, हीच या मॉडेलची खरी ओळख ठरते.

“विद्यापीठ हे केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता समाजपरिवर्तनाचे सक्षम साधन बनले पाहिजे. ‘गोंडवाना मॉडेल’मधील उपक्रम हे स्थानिक समस्यांवर संशोधनाधारित उपाय शोधण्याचे उदाहरण आहेत. ग्रामीण विकासासाठी हे मॉडेल देशभर प्रेरणादायी ठरेल,” असा विश्वास कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पाच्या यशामागे कार्यक्रम अधिकारी स्वप्नील गिराडे, सहायक प्राध्यापक डॉ. मनीष देशपांडे आणि गंधर्व पिल्लारे यांच्या समन्वयात्मक कार्याचा मोठा वाटा राहिला. तसेच प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण आणि वित्त अधिकारी भास्कर पठारे यांच्या प्रशासनिक पाठबळामुळे हा उपक्रम साकार झाला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.