वैरागड येथे गणेशोत्सवाचा भव्य सोहळा – भक्तिभाव, सांस्कृतिक रंगत आणि समाजबंधांची अविस्मरणीय मेजवानी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली:आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाने गावासह पंचक्रोशीला भक्तिभाव, स्पर्धांचा उत्साह आणि सांस्कृतिक बहारदार रंगांनी उजळून टाकले. भोलूभाऊ सोमनानी मित्र परिवाराच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाने यंदा सर्व स्तरांतील नागरिकांचा सहभाग मिळवत सामाजिक एकतेचा, सामूहिक आनंदाचा आणि परंपरेच्या जपणुकीचा ठसा उमटवला.
उत्सवाची सांगता भव्य मिरवणुकीने झाली. दहा दिवसांच्या काळात रात्रीची कबड्डी स्पर्धा हे प्रमुख आकर्षण ठरले. विजेत्या संघाला तब्बल २२२२२ रुपयांचे पहिले पारितोषिक शितल सोमनानी यांच्या हस्ते देण्यात आले, तर गौरी सोमनानी यांच्या हस्ते १११११ रुपयांचे दुसरे आणि शोभाताई सोमनानी यांच्याकडून ५५५५ रुपयांचे तिसरे बक्षीस देण्यात आले. कबड्डीच्या तालासोबतच महिलांसाठी पाककला व रांगोळी स्पर्धा, तर तरुणांसाठी समूह व एकल नृत्य स्पर्धांनी उत्सवाला अधिक रंगत आणली. विजेत्यांना आकर्षक बक्षिसांनी गौरविण्यात आले.
भजन संमेलनात पंचक्रोशीतील भजन मंडळांनी रात्रभर भक्तिरस ओतप्रोत सादरीकरण करून वातावरण प्रसन्न केले. यंदाच्या उत्सवाची खासीयत म्हणजे प्रथमच लावण्यात आलेला मिनाबाजार. गडबडगोंधळ, झगमगाट आणि मुलांच्या हशांनी भरलेल्या या मिनाबाजाराने गावकऱ्यांना नव्या अनुभवाचा आनंद दिला.
समारोपाच्या दिवशी समाजकल्याणाचा सुंदर उपक्रम राबविण्यात आला. आसपासच्या गावांतील साडेसातशेहून अधिक वयोवृद्ध, विधवा भगिनी व ज्येष्ठ नागरिकांचा शाल व साडी देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या डोळ्यात दाटलेले अश्रू, ओठांवरचे हसू आणि हृदयातील समाधान या सत्काराचे मोल अधिक अधोरेखित करत होते. प्रतिनिधिक स्वरूपात निवडक मान्यवरांचा सत्कार आमदार व माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते झाला.
गोपाळकाल्याच्या हंडीत भजनाच्या तालावर जेव्हा आ. धर्मरावबाबांनी फटका मारला, तेव्हा क्षणभरासाठी संपूर्ण परिसर आनंदाने गजबजून गेला. हंडीतून ओघळणारे दही-माखन जणू एकतेचे प्रतीक ठरले. त्यानंतर झालेले सत्कार सोहळे, बक्षीस वितरण आणि महाप्रसादाने या उत्सवाचा समारोप अविस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शितल सोमनानी यांनी केले, संचालन रामदास डोंगरवार यांनी तर आभार प्रदर्शन गौरी सोमनानी यांनी केले.
वैरागडातील हा गणेशोत्सव फक्त धार्मिक श्रद्धेचा नव्हे, तर सामाजिक एकतेचा, सांस्कृतिक समृद्धीचा आणि मानवी बंधांचा एक जीवन्त उत्सव ठरला.