गोंडवाना विद्यापीठात २१ जूनला भव्य योग दिन सोहळा; जिल्हा प्रशासन आणि विविध संस्थांचा पुढाकार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, १९ जून : शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक शांततेचा अद्वितीय संगम असलेल्या योगाच्या जागतिक महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून गोंडवाना विद्यापीठाच्या प्रांगणात सकाळी ७ ते ८ दरम्यान भव्य योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन, गोंडवाना विद्यापीठ, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि विविध योग संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत असून, योग दिनाचे हे आयोजन भव्य आणि व्यापक स्तरावर साजरे होणार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केल्यानंतर दरवर्षी जगभर आणि भारतात हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. यंदा गडचिरोली जिल्ह्यातही उत्साहाचे वारे वाहू लागले असून या निमित्ताने योगप्रेमींना एकत्र येण्याची पर्वणी मिळणार आहे.
जिल्ह्यातील नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी, क्रीडापटू, शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद व विविध शासकीय विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पुढे यावेत असे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, एनसीसी, नेहरू युवा केंद्र, विविध सामाजिक संस्था आणि औद्योगिक प्रतिष्ठानांनीही आपल्या स्तरावर योग दिन साजरा करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे. योगाच्या माध्यमातून तणावमुक्त, निरोगी आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणारा हा दिन, एक सामाजिक ऊर्जा देणारा सोहळा ठरणार आहे.
Comments are closed.