Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तलाठी भरती प्रकरणात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, औरंगाबाद उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश

Get real time updates directly on you device, subscribe now.

मराठा समाजातील निवड झालेल्या उमेदवारापेक्षा कमी गुण असलेल्या इतर उमेदवारांना आर्थिक मागास प्रवर्गातून नियुक्त्या न देण्याचे आंतरिम आदेश न्यायालयाने दिले आहेत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

औरंगाबाद, 21 डिसेंबर : मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती असल्याने मराठा उमेदवारांना आर्थिक मागासलेल्या प्रवर्गाचा लाभ देण्यात यावा व तलाठीपदी नियुक्ती देण्यात यावी याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल असून मराठा समाजातील निवड झालेल्या उमेदवारापेक्षा कमी गुण असलेल्या इतर उमेदवारांना आर्थिक मागास प्रवर्गातून नियुक्त्या न देण्याचे अंतरिम आदेश न्यायालयाने दिले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ई.डब्ल्यू.एस प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना याचिका कर्त्यांपेक्षा कमी गुण आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात तलाठी भरती करिता निवड झालेल्या मराठा समाजातील उमेदवारांनी याचिका दाखल केली आहे. यावर न्या. एस व्ही गंगापूरवाला व न्या. श्रीकांत डी कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर 18 डिसेंबर रोजी सुनावणी झाली.

तलाठी भरती करिता झालेल्या चाचणी परीक्षेमध्ये मराठा समाजातील उमेदवारांना ई डब्ल्यू एस मधून निवड झालेल्या उमेदवारांना पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत मराठा उमेदवार हे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गाचा लाभ घेण्याकरिता देखील पात्र आहेत. त्यांना त्याचा लाभ देण्यास औरंगाबाद जिल्हा निवड समितीने डावलले असल्याने निवड समिती अंतर्गत झालेल्या परीक्षेमध्ये सर्वात जास्त गुण मिळून देखील नियुक्ती मिळत नसल्याने अ‍ॅड. स्नेहल जाधव यांच्यामार्फत शितल झिरपे व अ‍ॅड. विशाल कदम यांच्या मार्फत वर्षा आकात, विक्रम वरपे, सोळुंके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर प्रकरणात अँड. सुविध कुलकर्णी व विशाल कदम यांनी युक्तिवाद केला. एस. ई. बी. सी. प्रवर्गाच्या जागा रिक्त ठेवून इतर प्रवर्गाला नियुक्‍त्या देण्याचा आदेश न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी नियुक्तीची प्रक्रिया जलदगतीने सुरू केलेली असतानाच सदरील आदेश हा मराठा समाजावर अन्याय करणारा असून यामुळे गुणवत्ता असून देखील नियुक्ती पासून उमेदवार वंचित राहत असल्याचा युक्तीवाद करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती, शासन निर्णय, मंत्री मंडळाचा ठराव, संविधनिक तरतुदी बाबत याचिका कर्त्यांच्या वकिलांनी सखोल विश्लेषण केल्याने सदरील प्रकरणात राज्य सरकारने ई. डब्ल्यू एस बाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निरीक्षण देखील न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणामुळे राज्यातील मराठा समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. सदर प्रकरणात केलेला युक्तिवाद हा न्‍यायालयाने अत्यंत गंभीरपणे घेतला असून राज्य सरकारने यापूर्वीच याबाबत निर्णय घ्यायला हवा होता असे मत व्यक्त केल्याने सरकारवर याचा दबाव वाढला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.