Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्यावतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार

बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी लवकरच बैठक घेऊ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ठाणे, दि. 16 ऑक्टोबर :- बंजारा समाजाच्या मागण्यांवर लवकरच एकत्रित बैठक घेऊन या मागण्या सोडविण्यात येतील. तसेच सिडकोच्या हद्दीत बंजारा समाजासाठी भूखंड देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या वतीने ठाण्यातील हायलँड मैदानातील कार्यक्रमात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, ठाण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, गुलबर्गा लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. उमेश जाधव, संघाचे अध्यक्ष डॉ. शंकर पवार, माजी महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, निसर्गावर प्रेम करणारा व त्याची पूजा करणारा, कष्टकरी बंजारा समाज हा राज्याचे वैभव आहे. महाराष्ट्र राज्याच्या उभारणीत व विकासात या समाजाचे योगदान आहे. जिद्द, चिकाटी व मेहनतीमुळे समाज मुख्य प्रवाहात येत आहे. आतापर्यंत शिक्षण व आरोग्य यापासून वंचित असलेला समाज यापुढील काळात त्यापासून वंचित राहणार नाही. या समाजाबद्दल माझ्या मनात नेहमीच आपुलकी व आत्मियतेची भावना राहिली आहे. या समाजाच्या प्रश्नांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. पोहरा देवी तीर्थक्षेत्राचा विकासकामे सुरू करण्यात येतील. तांडा वस्ती विकासातून मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल. सेवालाल महाराजा यांच्या जयंतीदिनी सुट्टी देण्यासंदर्भातही राज्य शासन विचार करेल. गेल्या तीन महिन्यात सर्वसामान्यांसाठीच महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. गोरगरिब सामान्य नागरिकांची दिवाळी चांगली जावी यासाठी शंभर रुपयात अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. हे शासन सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे म्हणून जनता पाठिशी उभी आहे, असेही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोहरादेवी तीर्थस्थळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री
बंजारा भाषेतून संवाद साधत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, बंजारा समाज हा सिंधू संस्कृतीशी नाते सांगणारा आहे. पर्यावरणाची पूजा करणारा हा समाज आहे. टॅटू चा जनक हा समाज आहे. या समाजाकडे मोठी ज्ञान भांडार आहे. अशा या बंजारा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येईल. तसेच केंद्र शासनाकडे असलेले प्रलंबित प्रश्न ही तातडीने सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्न करू. देशभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जे राष्ट्रीय महामार्ग बनविले ते सर्व हे लमाण मार्गावर आहेत. या मार्गावरूनच पारंपरिक बंजारा समाज भ्रमण करत असे. सेवालाल महाराज यांच्या रूपाने समाजाला दिशा, विचार देणारे संत मिळाले. त्याच्यामुळे समाजाचे वैश्विक संघटन तयार झाले. संत रामराव महाराज यांचे आमच्यावर खूप प्रेम होते. नेहमीच त्यांचे आशीर्वाद मिळाले. पोहरादेवी विकासासाठी शंभर कोटी दिले. त्याचे काम आता वेगाने पूर्ण होईल. जागतिक दर्जाचे हे स्थान होईल. पोहरा देवीच्या विकासासाठी एक पैसाही कमी पडू देणार नाही.

अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. राठोड म्हणाले की, गरिब, कष्टकरी असलेला बंजारा समाजाचे अनेक प्रश्न आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासन बंजारा समाजाच्या सर्व मागण्या सोडवेल असा विश्वास आहे. या समाजासाठी मुंबईत हक्काचे भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच जातीच्या आरक्षणासंबंधी एकसुत्रीपणा आणण्यासाठी राज्य शासनाने मदत करावी. समाजातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी सवलती, वसतीगृहात प्रवेश याबरोबरच नागरी सुविधा मिळाव्यात.
यावेळी संघाचे अध्यक्ष शंकर पवार यांनी प्रास्ताविकात समाजाच्या मागण्या मांडल्या. गुलबर्ग्याचे खासदार उमेश जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.